भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी लोकांसाठी काशी-सारनाथ यात्रेचं आयोजन केलं आहे. यावरून पत्रकारांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली. यावर पटोले म्हणाले की, “भाजपा हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट आहे. पण आता कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. लोक भाजपासोबत जाणार नाहीत.”
पटोले म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीद्वारे लोकांचा कल समजला आहे. आपण नुकतंच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाहीलं की, महविकास आघाडीची पंचसूत्री होती. त्याचं त्यांनी पंचामृत केलं. अमृत देत असताना त्यात विष कालवून देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे आता त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी काही होणार नाही. त्याचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. येणाऱ्या काळात जनता भाजपाला सत्तेच्या बाहेर काढेल.
हे ही वाचा >> “राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!” भाजपा नेत्याची मागणी, जमीनही सुचवली
“केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत” : पटोले
दरम्यान, H3N2 Influenza हा आजार सर्वत्र पसरू लागला आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पटोले म्हणाले की, सगळे आजार हे विदेशातून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने काही सल्ले दिले ते केंद्र सरकारने ऐकले नाहीत. त्यांनी सांगितलेले निर्बंध भारताने लावले नाहीत. देशाच्या सीमा सील करण्यास सांगितलं, ते केलं नाही. उलट नमस्ते ट्रम्प करत देशात कोरोनासारखा आजार आणला. यामुळे देशाची मोठी हानी झाली. अशा प्रकारचे विदेशी आजार देशात पसरत असताना त्याला प्रतिबंध करण्याऐवजी केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत आहे. त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.