विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्याअनुषंगाने आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. मात्र, त्याआधी विधानसभेत चर्चा झालेल्या मुद्द्यांवरूनही सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यातील महत्त्वाचा मुद्दा होता पुणे पोर्श कार अपघात प्रकरण. या मुद्द्यावरून आज सकाळी विधानसभेत दोन्ही बाजूंनी खडाजंगी झाली. ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर सविस्तर निवेदन दिलं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर आपली भूमिका मांडली.

“दोन्ही प्रकरणात ससून रुग्णालयाचा संबंध”

“माझ्या मित्राचं उत्तर मी शांतपणे ऐकत होतो. ड्रग्जच्या बाबतीत रोहित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या मुलानं बिअर बारमध्ये दारू प्यायली वगैरे सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्या आहेत. पण या प्रकरणात दारूपेक्षा ड्रग्जचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा प्रकार महाराष्ट्रात गंभीर झाला आहे. ललित पाटीलचं नातं ससून रुग्णालयाशी जोडलं गेलं. पुणे पोर्श अपघात प्रकरणातही ससून हॉस्पिटलचं नातं मोठ्या प्रमाणावर जोडलं गेलं. हे डॉक्टर तावडे कोण? असे विद्वान लोक सरकारच्या आशीर्वादाने या संस्थांमध्ये बसले आहेत”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.

“गुजरातहून ड्रग्ज येतं”

“ड्रग्ज कुठून येतं यावर मी काही बोलणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल खोटं बोलता, रेटून बोलता. अपप्रचार करता वगैरे. ते गुजरातच्या मुंद्रातून येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी यात हेत्वारोप करतो असं नाही. पण हा महाराष्ट्रावर कलंक आहे. पुण्यासारख्या शहरात असा कलंक लागणं हे दुर्दैवी आहे. या घटनांच्या पाठिशी कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. या घटनेत पोलिसांनी जी काही कारवाई केली, त्यात राजकीय व्यवस्थेचा दबाव त्यांच्यावर सातत्याने होता. हा दबाव आणणारा कोण होता? महाराष्ट्रात हे प्रश्न निर्माण झाले आहेत”, असंही नाना पटोले म्हणाले.

“डॉ. तायडेला कुणाचा आशीर्वाद होता? ससूनचा ड्रग्जशी काय संबंध? ललित पाटलाला व्हिआयपी ट्रीटमेंट का दिली गेली होती? ससून हॉस्पिटल या सगळ्या ड्रग्ज व्यवस्थेशी संबंधित आहे. रक्त नमुना तपासण्याच्या प्रक्रियेत दारूचं प्रमाण दिसणार. पण दारू प्यायलेल्या व्यक्तीला नंतर माफच केलं जातं. मात्र, ड्रग्ज हा विषय त्याच्या रक्तनमुन्यांमध्ये येणारच नाही असा आम्हाला संशय आहे. त्याची स्पष्टता गृहमंत्र्यांनी करावी”, असी मागणी नाना पटोलेंनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंना उत्तर

नाना पटोलेंच्या दाव्यांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. “राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई झालीच नसती. ससून हॉस्पिटलमधून डॉ. श्रीहरी हळनोर, डॉ. अजय तावडे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नाना पटोले, मी राजकारणात जायचं म्हटलं तर ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते मी सांगितलं होतं. तेव्हाच्या आयुक्तांनी कुणाला पत्र लिहिलं होतं, ते पत्र कसं दुर्लक्षित झालं, तो कधी अॅडमिट झाला हे मी सगळं सांगितलं. हे सगळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

Maharashtra Assembly Budget 2024-2025: “तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी; नेमका रोख कुणाकडे? तर्क-वितर्कांना उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आत्ताच्या स्थितीत आपल्या नवीन पिढीला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्याचा प्रयत्न चालला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून ड्रग्ज आणावे लागायचे. अलिकडच्या काळात केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत. ते आपल्याकडेच तयार होत आहेत. आपण कुरकुंभला गोडाऊन शोधून काढलं तिथे ते तयार करत होते. तिथे जवळपास ३ हजार ६०० कोटींचा माल आपण जप्त केला. तिथून तयार होऊन तो दिल्लीला जायचा. दिल्लीत खाण्याच्या पदार्थांमध्ये पॅक व्हायचा आणि विदेशात जायचा. आपण ते सगळं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं”, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.