काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंनी बुलढाण्यातील खामगांव येथे सुरु असणाऱ्या ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये बोलताना टीका केली. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्राने अजूनही राज्यपालपदी ठेवलंय, असा टोला पटोले यांनी नाराजी व्यक्त करताना लगावला.
वाईट वाईट गोष्टी राज्यपाल बोलले…
ओबीसी समाज अधिकार संमेलनातील भाषणादरम्यान नाना पटोलेंनी राज्यपालांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंबद्दल वाईट वक्तव्य केल्याचा संदर्भ देत टीका केली. “केवळ महाराष्ट्राच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्या सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना आपल्या राज्यांचे राज्यपाल म्हणाले एवढ्या कमी वयात लग्न झालेलं त्यांचं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल एवढ्या वाईट वाईट गोष्टी राज्यपाल बोलले,” असं नाना पटोले म्हणाले.
आमच्या आईबद्दल…
तसेच पुढे बोलताना, “राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर नाना पटोले…” असं म्हणत त्यांनी हातवारे करत इशारा केला आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या भाषणाला दाद दिली. “आमच्या आईबद्दल म्हणजेच सावित्रीबाई फुलेंबद्दल तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अशाप्रकारे कोणी वक्तव्य करत असेल (तर ते निंदनिय आहे)”, असंही पटोले म्हणाले.
नक्की वाचा >> “…तेव्हा राज्यपालांना टार्गेट केलं जातं, त्यांचा अपमान केला जातो”; फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण
केंद्रावरही साधला निशाणा
याच मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला, “त्यांना (केंद्र सरकारला) देशाची थोडी सुद्धा चिंता असती तर एका झटक्यात त्यांनी राज्यपालांना काढून टाकलं असतं. मात्र सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवी देणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात बसून ठेवलं आहे,” असं नाना पटोले म्हणाले.
राज्यपाल नेमकं काय म्हणालेले?
याच मुद्द्यावरुन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाल्यानंतर त्यांनी भाषण आटोपतं घेतलं होतं. सावित्रिबाई पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये बोलताना राज्यपालांनी सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं हसत हातवारे करताना सांगताना दिसले होते. “त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील,” असंही राज्यपाल म्हणालेले.
“काय ते हातवारे, काय ते हसणं… सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं होतं.
आता नाना पटोलेंच्या या टीकेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.