राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण झालेलं आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील राज्य सरकारवर टीका करण्याची किंवा राज्य सरकारला सुनावण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये देखील विरोधकांचंच नातं निर्माण झाल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवरून केलेल्या एका विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र आक्षेप घेत राज्यपालांना कडक शब्दांमध्ये सुनावलं आहे.

संघात नेहरुंच्या द्वेषाचे संस्कार!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा द्वेष करण्याचे संस्कार दिले जातात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. “पंडित नेहरुंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवले जातात तो नेहरुद्वेषच राज्यपालांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे. राज्यपालांचे हे विधान देशासाठी बलिदान देणाऱ्या व समस्त भारत देशाचा अवमान करणारे आहे. या विधानाबद्दल कोश्यारी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“राज्यपालांना दुसऱ्याच कामांमध्ये रस!”

पंडित नेहरुंबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपाधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारातून ते राज्यपाल पदावर असतानाही बाहेर आलेले दिसत नाहीत. राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

“राज्यपालांचं वर्तन पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारं”

“राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे त्यापदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहमंत्रालयाने कोश्यारी यांना परत बोलावावे”, असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची टीका

“तो मोदींचा कमकुवतपणा म्हणायचा का?”

“देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लष्करी ताकद किती होती आणि त्यानंतर पंडित नेहरु, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात देश लष्कराच्या बाबतीत सामर्थ्यवान बनला हे त्यांना दिसले नाही. अमेरिका व रशिया या दोन बलाढ्य जागतिक शक्तींना न जुमानता अणु कार्यक्रम राबविले. इंदिरा गांधींच्या सक्षम नेतृत्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला. हे कोश्यारी यांना माहित नाही का? अटलबिहारी वाजपेयी यांनीही पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता सुरु केली होती. वाजपेयी पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता करत असतानाच पाकिस्ताने कारगिल युद्ध घडवून आणले, मग वाजपेयी यांच्या शांततेच्या वाटाघाटी कमकुवतपणाचे लक्षण म्हणायचे का? नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानने वारंवार सीमेवर हल्ले केले, पुलवामा हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानी कुरापती करत असतानाही नरेंद्र मोदी अनाहूतपणे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन भेटले तेही कमुवतपणाचे लक्षणच म्हणायचे का?”, असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader