राज्यसभेची निवडणूक संपताच आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांनी तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक भाजपासाठी सोपी जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र असे असले तरी विरोधकदेखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा >>> १०० दिवसांत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराकडून खुलासा
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकासाठी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >>> मतभेद विसरा, एकत्र या; राष्ट्रपती निवडीवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
१८ जुलै रोजी मतदान होणार
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जून रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. ३० जूनपर्यंत अर्जाची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जुलै आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.