राज्यात काल (०२ जुलै) मोठं राजकीय नाट्य घडलं. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
“बुलढाण्यात भीषण अपघात झालेला असताना राजभवनात जयघोष केला जात होता”, अशी टीका नाना पटोले म्हणाले. “भाजपाचं हे कृत्य सगळ्यांना आता कळलं आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी दोन भ पाळले आहेत. एक म्हणजे भय आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचार”, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> बंडाच्या एक दिवस आधीच पक्षानं घेतला होता मोठा निर्णय? अजित पवार गट अडचणीत येणार?
“पहिला भ भयाचा म्हणजे ईडी आणि सीबीआयचं भय त्यांनी दाखवलं. तर भ्रष्टाचाराचे नवीन आयामच भापजपाने निर्माण केले”, असंही नाना पटोले म्हणाले. “या भ्रष्टाचाराच्या नव्या आयामालाच त्यांनी ऑपरेशन लोटस असं नाव दिलं आहे. असं घाणेरडं कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केलं जातं, हे राजकारण महाराष्ट्राच्या विचारांना न आवडणारं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलेलं आहे, याचे परिणाम भाजपाला येत्या काळात भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असंही नाना पटोले म्हणाले.