राज्याती एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कच्या जागेसाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना, आज(शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका फोटोमुळे नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवाय, विरोधकांना देखील मुख्यमंत्री शिंदेवर टीका करायला चांगली संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण, पाठीमागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असं लिहिलेला फलक आणि त्याच्या समोरील खुर्चीत चक्क श्रीकांत शिंदे बसल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील निशाणा साधला आहे.
हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लीम समाज आठवला – नाना पटोले
“मुख्यमंत्री करी दिल्लीवारी लेक झाला कारभारी, दुकान चालवायची रीत न्यारी लोकशाहीची थट्टा सारी.” असं पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.
“ती खुर्ची १३ कोटी जनतेचा स्वाभिमान आहे” –
“मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सगळ्यांनीच ठेवायचा असतो.तुम्हाला इतर शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घ्या. ती महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे”, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.
“तो फोटो आमच्या घरातला” –
तर, श्रीकांत शिंदेंनी खुर्चीमागे तो फलक होता, याची आपल्याला कल्पनाही नव्हती, असं म्हटलं आहे. “आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एक व्हीसी आहे. त्यासाठी ती व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठीच एखाद्या अधिकाऱ्यानं मागच्या बाजूला फलक आणून ठेवला असेल. पण तो फलक तिथे असेल, याची मला कल्पनाही नव्हती. हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडवण्याचं काम वर्षानुवर्ष होतंय. ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली होती”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.