काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं. आजच्या दिवशीच महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेने केला, असल्याचं नाना पटोले एक जाहीर कार्यक्रमात म्हणाले. यामुळे आता नवं राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण, काँग्रेसने आतापर्यंत नेहमीच महात्मा गांधींचा वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलेला आहे. मात्र आज खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडूनच आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच अशा शब्दप्रयोग केला गेल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता पटोलेंच्या या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता दिसत आहे.

“आजच्या दिवशीच पहिला दहशतवादी या देशात महात्मा गांधींच्या हत्याऱ्याच्या रूपाने नथुराम गोडसे हा पुढे आला आणि आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडेसेने केला.” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

तर या विधानावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर टीका केली आहे. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘ वध‘ असा उल्लेख करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या बुरसटलेल्या मानसिकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. ‘ वध‘ राक्षसांचा होतो, महापुरुषांचा नाही, हे या ‘अनपढ ‘ माणसाला कोण सांगणार?” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “ नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत. यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. त्यांनी असे वक्तव्य करू नये. मी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार आहे. त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष ठेवू नये अशी विनंती त्या पत्रातून करणार आहे. ” असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.