Uday Samant vs Deepak Kesarkar : कोकणातील नाणार रिफायनरीवरून महायुतीतील नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असे खासदार नारायण राणे म्हणाले होते. तर दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांनी ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का हे तपासावे लागेल असे म्हटले होते. पुढे कॅबिनेट मंत्री उदय सावंत यांनी लोकांना विश्वासात घेऊन सरकार नाणार प्रकल्पाबाबत सकारात्कम निर्णय घेईल असे विधान केले होते. यालाही माजी मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “उदय सामंत हुशार आहेत, त्यांना जगभराची माहिती आहे.”
काय म्हणाले होते उदय सामंत?
कॅबिनेट मंत्री उदय सामंत आज नाणार आणि बारसू रिफायनरीबाबत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “नाणारमधील रद्द झालेली रिफायनरी बारसू येथे व्हावी अशी मागणी २०१९-२० मध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. रद्द झालेली बारसूची रिफायनरी या पत्रानंतरच जन्माला आली. जर लोकांनी परत सांगितले की, आमचे गैरसमज दूर झाले आहेत आम्ही रिफायनरी बाबत सकारात्मक आहोत. तर सरकारही सकारात्मक निर्णय घेईल.”
केसरकरांचे उत्तर
दरम्यान आजच पत्रकारांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांना नाणार-बारसू रिफायनरीबाबत प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर म्हणाले, “उदय सामंत तर येवढे हुशार आहेत की, त्यांच्याबद्दल कोणी बोलूच शकत नाही. त्यांना जगभराची पूर्ण माहिती असते. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे या प्रकरणावर अभ्यास केलेला असणार.”
हे ही वाचा :
केसरकरांना मंत्रिमंडळातून डावलले
मंत्रिमंडळातून वगळल्याने मी नाराज नाही असे सांगणारे दीपक केसरकर यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मी मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर जाणार असेन असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महायुतीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे.