नांदेड : अल्पवयीन मुलीला तिच्यासोबत गैरकृत्य केलेली चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

हदगाव तालुक्यातील नराधमाने मुलीला पोलीसमध्ये भरती व्हायची इच्छा असल्याने नोव्हेंबर २०२४ या महिन्यात दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुला पोलीस अकॅडमी दाखवून आणतो असे सांगत चारचाकी वाहनातून एकटीलाच घेऊन नांदेडच्या दिशेने निघाला. त्यानंतर त्याने तामसा-नांदेड रोडवर एका धार्मिक स्थळासमोर गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली व नंतर तिच्यावर नराधमाने अत्याचार केला. त्यानंतर या घटनेचे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन वेळोवेळी मुलीवर अत्याचार केला. या दरम्यान संंबंधित विद्यार्थिनी गरोदर राहिली. ही बाब तिने नराधमाला सांगितल्यानंतर त्याने नांदेड येथील दवाखान्यात गर्भपात घडवून आणला.

वरील सर्व प्रकार मुलीने घरी आईला सांगितल्यानंतर घरच्या मंडळींना धक्का बसला. या प्रकरणी पीडित मुलीने तामसा पोलीस स्थानकात तक्रार दिल्यावरून पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गावात बंद

संबंधित घटनेची माहिती तामसा येथील नागरिकांना व पालकांना समजताच त्यांनी तामसा पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ तामसा गावात बंद पाळण्यात आला.

Story img Loader