नांदेड : भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनात्मक निवडणुकीत मंडळ अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा निश्चित केल्यानंतरही जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये ही अट गुंडाळून टाकत अध्यक्ष निवडण्यात आल्याचे समोर आले आहे. बहुतांश ठिकाणी पक्षाच्या संबंधित आमदारांचा कल पाहून अध्यक्ष निवडण्यात आले. पक्षविरोधी काम केलेल्यांनाही संधी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात शहरासाठी महानगराध्यक्ष आणि ग्रामीण भागासाठी उत्तर आणि दक्षिण विभागाचे दोन जिल्हाध्यक्ष अशी भाजपाची संघटनात्मक रचना असून, या तीन संघटनात्मक जिल्ह्यांत ४७ मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये पक्षाचे जिल्ह्यातील आमदार-खासदार आणि अन्य संबंधितांची बैठक झाली होती. त्यानंतर पक्षाने जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व मंडळांचे अध्यक्ष मुंबईतच निश्चित करून टाकल्याचे समोर आले आहे.
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र भाजपामध्ये ‘संघटन पर्व’ सुरू असून, राज्याच्या पक्ष निवडणूक अधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करून निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक आखून दिले होते; पण शेवटी आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या शिफारशीचा मान राखला गेला, असे पक्षातूनच सांगण्यात आले.पक्षातील मंडळ अध्यक्षपदासाठी निवडणूक अधिकारी यांनी ३५ ते ४५ अशी वयोमर्यादा निश्चित करून दिली होती. पण खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील बालाजी गव्हाणे यांची अर्धापूर ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. ते आता ५२ वर्षांचे आहेत, (जन्मसाल १९७३) असे सांगण्यात आले.
मुदखेड ग्रामीण मंडळ अध्यक्षपदासाठी बारडचे राजाराम ऊर्फ बाळू बारडकर हे इच्छुक होते. पण त्यांचे नाव वयाच्या अटीमुळे आधीच बाद झाले. खासदार चव्हाण यांनी गव्हाणेंच्या बाबतीत जो अपवाद केला, तो बारडकरांसाठी करण्यात आला नाही. ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक भागवत देवसरकर हे हदगाव पूर्व मंडळाचे अध्यक्ष झाले आहेत.नांदेड महानगरातील ९ मंडळांचे अध्यक्षही निश्चित झाले असून, त्यातील विश्वंभर शिंदे यांनीही वयोमर्यादा पार केलेली आहे. अन्य काही मंडळ अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला होता; पण पक्षाने त्यांना मंडळ अध्यक्षपदाची बक्षिसी दिली आहे. जंगमवाडी मंडळात आशिष नेरळकर यांची फेरनिवड झाली आहे.
‘नांदेड उत्तर’चे नवे मंडळ अध्यक्ष
किनवट शहर – स्वागत आयनेनिवार, किनवट उत्तर – उमाकांत कराळे, किनवट दक्षिण – सूर्यकांत आरडकर, माहूर – नीळकंठ मस्के, हदगाव शहर – बालाजी कदम पाटील, हदगाव पूर्व – भागवत देवसरकर, हदगाव पश्चिम – सूर्यकांत हनवते, हिमायतनगर – गजानन चायल, अर्धापूर शहर – योगेश हळदे, अर्धापूर ग्रामीण – बालाजी गव्हाणे, मुदखेड ग्रामीण – दत्तू देशमुख, मुदखेड शहर – रामसिंग चव्हाण, भोकर ग्रामीण – दिवाकर रेड्डी सुरकुंटवार, भोकर शहर – विशाल विठ्ठल माने.‘नांदेड शहर’ नवे मंडळ अध्यक्षजंगमवाडी – आशिष नेरळकर, शिवाजी नगर – अमित वाघ, उत्तर ग्रामीण – बापुराव पावडे (बंडू पावडे), तरोडा – सांगवी – सुनील राणे, नवा मोंढा – भालचंद्र पवळे, सिडको – सचिन रावका, नांदेड द. ग्रामीण – विश्वंभर शिंदे, हनुमान पेठ – अंबादास जोशी, गाडीपुरा-चौफाळा – आशिष ठाकूर.
राज्य पातळीवरील चित्र
महाराष्ट्रातील पक्षसंघटनेत २५८ नव्या मंडळांची निर्मिती करून ती संख्या १ हजार २२१ केली आहे. त्यातील ९५३ मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया प्रदेश भाजपाचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील मंडळांची संख्या २०७ आहे.