नांदेड : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या पुढाकारातून पुकारण्यात आलेल्या या बंदला प्रमुख राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. बंददरम्यान शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्य शासनाने तत्परतेने आवश्यक ती मदत केल्यामुळे नंतर कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही. वरील घटनेनंतर दहशतवाद विरोधातील लढाईत संपूर्ण देशात एकजूट असल्याचे पहावयास मिळाले.
नांदेडमध्ये सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या भ्याड हल्ल्याचा निषेध करत बंदची हाक दिली होती. व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभाग नोंदवत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. शहरातील प्राथमिक शाळांमध्ये शेवटचा पेपर असल्याने परीक्षा पार पडली. शाळा सुरू राहिल्या, तरी महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग बंद होते.
भाजपचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर, खासदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी बंदचे आवाहन केले होते. व्यापारी महासंघातर्फे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, हर्षद शहा, एकनाथ मामडे यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोटारसायकली रॅली काढण्यात आली. राज कॉर्नरपासून सुरू झालेली ही रॅली टॉवरपर्यंत नेण्यात आली. ठिकठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. नांदेडसह जिल्ह्यातील उमरी, नायगाव, हदगाव, किनवट, हिमायतनगर, कंधार येथेही बंद पाळण्यात आला. नायगाव येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.