नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड जिल्ह्यात मोठा विस्तार होत असताना, राज्यसभेच्या दोन खासदारांसह पाच आमदार आणि शेकडो पदाधिकार्यांचे बळ असलेल्या भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम मात्र जिल्ह्यात धिम्या गतीने सुरू असल्याचे पक्षाकडील आकडेवारीवरून दिसत आहे.
राज्यातल्या महायुती सरकारमधील भाजपा आणि इतर दोन प्रमुख पक्षांचे नेते आपापल्या पक्षांचे संघटन बळकट करण्याच्या मोहिमेवर आहेत. या मोहिमेत जिल्ह्यामध्ये ‘राष्ट्रवादी’ने मागील महिनाभरात दोन मोठे कार्यक्रम पार पाडले. शिवसेनेचे नेेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पक्ष विस्तारासाठी जिल्ह्यात एकदा येऊन गेले; पण विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजपा नेत्यांना लक्षवेधी प्रवेश सोहळा करता आला नाही.
नांदेड जिल्ह्यातील भाजपाची सूत्रे हळूहळू खा.चव्हाण व त्यांच्या समर्थकांकडे सरकत आहेत; पण चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघासह नांदेड महानगराचे कार्याध्यक्षपद भूषविणारे अमरनाथ राजूरकर यांच्या कार्यक्षेत्रातील दोन शहरी मतदारसंघांमध्ये भाजपा सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे २३ मार्चच्या पक्षाच्या अहवालातून समोर आलेे.
नव्या वर्षाच्या प्रारंभी प्रदेश भाजपा कार्यालयाने प्राथमिक सदस्य नोंदणीची मोहीम सुरू केली. या मोहीमेची मुदत संपल्यानंतर पक्षाने एकदा मुदतवाढही दिली. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, त्यासोबतच निवडणूक अधिकार्यांच्या नियुक्त्याही जाहीर झाल्या. प्राथमिक सदस्य नोंदणी झाल्यानंतर १५ मार्चपर्यंत सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना राज्याच्या पक्ष निवडणूक अधिकार्यांनी ७ मार्चच्या पत्रान्वये दिली होती; पण नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघांमध्ये हीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे बूथ अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष निवड यापुढच्या प्रक्रियाही लांबणीवर पडल्या असल्याचे सांगण्यात आले.
राज्याचे आणि भाजपा नेत्यांचे लक्ष असलेल्या भोकर मतदारसंघामध्ये किमान ६९ हजार प्राथमिक सदस्य होणे पक्षाच्या राज्य शाखेला अपेक्षित होते. १० फेब्रुवारीपर्यंत या मतदारसंघात ५८ हजार सदस्यांची नोंद झाली. आता ती ६२ हजारापर्यंत गेली आहे. स्वतः अशोक चव्हाण व त्यांच्या आमदार कन्येने भोकर मतदारसंघातील संघटनात्मक बाबींत लक्ष घातले, तरी या भागात सदस्य नोंदणीची उद्दिष्टपूर्ती झाली नाही. १० फेब्रुवारीपर्यंत नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा, हदगाव, देगलूर हे मतदारसंघ सदस्य नोंदणी अभियानात खूप मागे होते. आजही हे मतदारसंघ उद्दिष्टपूर्ती पूर्ण करू शकलेले नाहीत.
दोन मतदारसंघांचीच उद्दिष्टपूर्ती
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघात १० फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीतच १०० टक्क्यांहून अधिक सदस्य नोंदणी पूर्ण केली होती. स्थानिक आमदार राजेश पवार यांचे त्यामागे नियोजन होेते. त्यानंतर आ.तुषार राठोड यांच्या मुखेड मतदारसंघातही १०० टक्के सदस्य नोंदणी झाली. इतर ७ मतदारसंघांमध्ये मात्र सदस्य नोंदणीचे अद्यापही पूर्ण झालेले नाही. भोकर ९१ टक्के, नांदेड उत्तर ६७ टक्के, किनवट ७३ टक्के, लोहा ६४ टक्के, नांदेड दक्षिण ६१ टक्के, देगलूर ६१ टक्के आणि हदगाव ४५ टक्के. अशी २३ मार्चची स्थिती होती. जिल्ह्यात पक्षाची अशी स्थिती असताना खा.अशोक चव्हाण दिल्लीत अमित शाह व अन्य नेत्यांना भेटून जिल्ह्यात सारे काही आलबेल असल्याचे सांगत आहेत.