नांदेड : शिस्तबद्ध अशी आपली ओळख सांगणाऱ्या भाजपच्या नांदेड पक्ष संघटनेत मूळ विचारधारेतील कार्यकर्ते विस्थापित झाल्यामुळे या पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नांदेड आगमनप्रसंगी आठवडाभरात पक्षातूनच दुसऱ्यांदा शिष्टाचारभंग झाल्याचे बघायला मिळाले.
प्रा. राम शिंदे शिर्डी येथून एका खासगी विमानाने रविवारी दुपारी नांदेड विमानतळावर दाखल झाले. पण त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचा एकही आमदार विमानतळावर हजर नव्हता. या पक्षाचे पूर्वी खासदार राहिलेले आणि आता भाजपाच्या मित्रपक्षाचे आमदार असलेले साईभक्त प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र शिर्डीहून आलेल्या, महत्त्वाच्या पदावरील शिंदे यांच्या बाबतीत श्रद्धा बाळगत विमानतळावरील शिष्टाचार पाळलाच आणि नंतर आपल्या निवासस्थानी सभापतींचा यथोचित सन्मानही केला. चिखलीकरांसोबत शिवसेना आमदार आनंद पाटील बोंढारकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि सुभाष साबणे हे विमानतळावर उपस्थित होते.
प्रा. शिंदे यांच्यासह भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले मागील आठवड्यातही खासगी विमानाने नांदेडला आले होते. तेव्हाही भाजपाच्या आमदारांसह स्थानिक पदाधिकारी यांनी शिंदे-भोसले यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली होती.
भाजपाने ज्या समाजघटकातील कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये आणले, त्यामध्ये राम शिंदे हे ठळक नाव समजले जाते. पक्षाने अलीकडेच त्यांना विधान परिषदेच्या सभापतिपदी विराजमान केल्याबद्दल रविवारी दुपारी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठीच येथे आलेल्या शिंदे यांच्या आगमनप्रसंगी भाजपाचे हंगामी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर विमानतळावर हजर होते. पण पक्षाच्या आजी-माजी आमदारांपैकी विमानतळावर कोणीही फिरकले नाही, असे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सभापती शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच सर्व लोकप्रतिनिधींना कळविण्यात आला होता. शिंदे यांनी आमदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट देण्याचा मनोदय त्यांना स्वतंत्रपणे कळविला होता. पण केवळ चहा-पाण्यावर बोळवण न करता त्यांनी सभापतींच्या सन्मानार्थ आपल्या बोरबन फॅक्ट्री परिसरातील निवासस्थानी भोजन समारंभ आयोजित केला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व प्रमुखांनाही निमंत्रित केले होते.
शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदासाठी खासदार अशोक चव्हाण यांचे नाव आधीच निश्चित केले होते. त्यानुसार नियोजित कार्यक्रमास हजर राहण्यासाठी ते रविवारी सकाळीच नांदेडमध्ये आले. चिखलीकर यांनी मित्रपक्षाचे नांदेडमधील प्रमुख नेते या नात्याने चव्हाण यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यास्तव संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण चव्हाणांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. चिखलीकरांकडील भोजनास भाजपातील प्रमुखांपैकी कोणीही हजर नव्हते.