नांदेड : ज्या तत्वज्ञानाचा संपूर्ण जग जागरुकपणे अंगीकार करतेच, ते तत्वज्ञान विश्व शांतीदूत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया (बिहार राज्य) येथे प्राप्त झाले. ते ठिकाण बौद्ध भिख्खू आणि अनुयायांच्या स्वाधीन करावे तसेच महाराष्ट्रातील एका बौद्ध भिख्खुंची महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी नांदेड येथे मंगळवारी (दि. २५) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भंतेजींनी केले.

बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे; परंतु बुद्धगया मंदिर कायदा १९४९ अधिनियमानुसार हा महाविहार बौद्धेतर धर्मियांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे बुद्धाच्या तत्वज्ञानाची अवहेलना होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाण बौद्ध भिख्खू तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे. तेथील ट्रस्टवर महाराष्ट्रातील एका भिख्खुची प्रतिनिधी म्हणून निवड करावी, या मागणीसाठी नांदेडमध्ये मंगळवारी महामोर्चा संपन्न झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर बौद्ध अनुयायी एकत्र आले. तिथून व्हीआयपी रोड मार्गे आयटीआय-शिवाजीनगर-कलामंदिर, शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा गेला. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी भिख्खुंच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले होते. मार्च महिना असूनही ऊन मात्र प्रचंड असून या उन्हात मोर्चेकऱ्यांसाठी थंड पाणी व फराळाची व्यवस्था मोर्चाच्या मार्गावर विविध संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. तळपत्या उन्हात हजारो अनुयायी सहभागी झाल्याने रस्ता फुलून गेला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात भिख्खुंच्या हस्ते एक सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यात वरील विषय व बुद्धगया येथे बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध सुरु असलेल्या प्रकाराचा सविस्तर उहापोह करुन बौद्धांचे हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हवाली करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे गृहमंत्री, बिहारचे राज्यपाल तसेच युनेस्कोचे चेअरमन यांना देण्यात आले आहे. या मोर्चात बौद्ध भिख्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वरील मागणीसाठी मागील आठ दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले व तहसील कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली. मंगळवारी नांदेडमध्ये निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रणरणत्या उन्हात निघालेल्या या मोर्चामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेवर ताण पडला. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.