नांदेड : महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या सोयी सुविधा व प्रस्तावित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्याकडे लक्ष दया, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी माहूर येथे दिल्या.

माहूर गडावर बुधवारी त्यांनी भेट दिली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता भोकर प्रशांत कोरे, तहसीलदार किशोर यादव, मंदिर विश्वस्त उपस्थित होते. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या,रस्त्यांचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांशी चर्चा केली.

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगडासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर राहुल कर्डीले हे प्रथमच माहूरगडला आले होते. शासकीय विश्रामगृहात प्रथम त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांचेकडून श्री रेणुकादेवी मंदिर पायथ्याशी सुरु असलेल्या लिफ्ट्सह स्काय वॉक कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, उपकार्यकारी अभियंता देवराव भिसे, शाखा अभियंता रवींद्र उमाळे, आकाश राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांचेसह मंडळाधिकारी व महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.

शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता मोहिते,मेघराज जाधव,श्री रेणुका माऊली व्यापारी असो.चे अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील, मुख्य सल्लागार वसंत कपाटे, उपाध्यक्ष गोविंद आराध्ये,विनोद भारती,विकास कपाटे व राजु सौंदलकर यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कर्डीले यांनी माहूर दौऱ्यात यात्री निवास,मातृतीर्थ तलाव व रेणुकागडावरील लिफ्ट्सह स्कायवॉकच्या कामाची पाहणी केली.

Story img Loader