नांदेड : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जणं घराणेशाहीतून किंवा एखाद्या राजकीय पक्षातील बड्या नेतृत्वाच्या मेहेरबानीतून सहजपणे आमदार-खासदार झाले, पण सुमारे ४० वर्षे राजकारणात सक्रिय राहून तसेच सत्तेतील नेत्यांच्या निकट असूनही काहींची विधिमंडळात जाण्याची संधी मात्र हुकली. बुधवारी (दि.१९) नागपूर येथे निधन पावलेले विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड हे सुद्धा अशी संधी हुकलेल्यांपैकीच एक कार्यकर्ते होते! अनंतराव घारड (वय ७७) यांचे निधन झाल्याचे वृत्त बुधवारी दुपारी आल्यानंतर नांदेड मुक्कामी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तातडीने नागपूरला रवाना झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी येथे दिली.
घारड यांच्या निधनाबद्दल मराठवाड्यातल्या काँग्रेस पक्षातील अनेक जणं अनभिज्ञ असताना, आता भाजपाचे खासदार असलेले चव्हाण मात्र आपल्या पिताश्रींच्या जुन्या सहकार्यास अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी उपराजधानीत हजर राहिले. या पार्श्वभूमीवर अनंतराव घारड यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली असता प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या कुुटुंबाचा सहवास, साथ असतानाही त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेत जाण्याची संधी एकदाही मिळाली नाही, असे दिसते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीयमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घारड यांचा १९७५च्या सुमारास संबंध आला आणि कालांतराने ते चव्हाण परिवाराचे अत्यंत निकटवर्ती झाले. तत्पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सार्वजनिक जीवनात पदार्पण झाले होते. आणीबाणीनंतर शंकररावांवर वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रसंग आला, तेव्हा घारड हे त्यांच्या पक्षाचे विदर्भातील प्रमुख नेते झाले. शंकरराव १९८६ साली दुसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मचारी भरती करण्यासाठी तत्कालीन सरकारने स्थापन केलेल्या प्रादेशिक दुय्यम सेवा मंडळाचे अध्यक्षपद वगळता घारड यांच्या वाट्याला एकही मानाचे पद आले नाही. असे असले, तरी शंकरराव हयात असेपर्यंत आणि नंतर त्यांच्या पश्चातही त्यांनी चव्हाण परिवारासोबतचे नाते आणि काँग्रेसनिष्ठा सोडली नाही.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अडचणीच्या काळात साथ दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना १९८० किंवा नंतर संधी मिळाली होती. नांदेडचेच दिवंगत बाजीराव शिंदे हे तर दोनदा आमदार झाले, काही काळ राज्यमंत्रीही राहिले. नांदेडच्याच फारूक पाशा यांना वसंतदादा पाटील यांनी सांगलीच्या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आणण्याची किमया केली होती. एका ठिकाणी वास्तव्य; पण निवडून आला दुसरीकडून अशी बरीच उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. राजकीय नेत्यांचे स्वीय साहाय्यक राहिलेले कार्यकर्तेही आमदार झाले असले, तरी सुमारे ४० वर्षे राजकारणात कृतिशील राहूनही घारड यांना आमदार होता आले नाही. किंबहुना त्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी संधी देण्याची समयसूचकता तत्कालीन काँग्रेस नेत्यांना साधता आली नाही.
स्वतः घारड यांनी ‘आधुनिक भगीरथ’ ह्या डॉ.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरवग्रंथात आपल्या श्रद्धास्थानावर सविस्तर लेख लिहिला होता. त्यात शंकररावांनी त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न सतत केल्याचे नमूद करून ‘माझ्या प्रारब्धात ते नव्हते’, असे त्यांनीच म्हटले आहे. तिकिट मिळाले नाही किंवा पक्षाने आमदार केले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाही कधी सोडला नाही, ही बाब त्यांची पक्षनिष्ठा अधोरेखित करणारी ठरली. गतवर्षी अशोक चव्हाण व त्यांचे अनेक सहकारी भाजपात गेले, तरी घारड मात्र शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले.
अशोक चव्हाण २००८ ते १० दरम्यान दोनदा मुख्यमंत्री राहिले. या काळात घारड यांना विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी संस्था मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उभे करण्यात आले होते. पण तेव्हा संबंधितांनी घारड यांना निवडून आणण्याच्या बाबतीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली नाही. परिणामी त्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. अशोक चव्हाण यांचे दुसरे मुख्यमंत्रीपद अल्पकालीन ठरल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या राजवटीत घारड यांना मोठी राजकीय संधी मिळालीच नाही. पण त्यावरून कधीही, कोेठेही खळखळ न करता हा कार्यकर्ता नागपूरसह मराठवाड्यातही चव्हाणनिष्ठ म्हणूनच शेवटपर्यंत ओळखला गेला.