लोकसत्ता वार्ताहर
Nanded Crime नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात असलेल्या मौजे रुई येथे मुस्लीम समाजातील सामान्य कुटुंबात झालेल्या शेतजमिनीच्या वादात समाधानकारक तोडगा निघाला नाही. मात्र यावरुन जो वाद झाला त्या वादातातून दोन सख्ख्या भावांनी परवेझ पंटूस देशमुख या आपल्या २१ वर्षीय चुलत भावाच्या छातीवर धारदार विळ्याने वार करून त्याची हत्या ( Nanded Crime ) केली. थरकाप उडविणार्या या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं. माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घटना घडली?
रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रुई गावाचे पोलीस पाटील परसराम भोयर यांच्या घरी पंटूस शेरूसाहेब देशमुख व त्यांचा पुतण्या साहील बबलू देशमुख यांच्यातील शेतजमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक भरवण्यात आली होती. पंटूस यांच्यासह त्यांच्या परिवारातील इतर सदस्य तसेच दुसर्या बाजूने त्यांचे पुतणे साहील व सोहेब देशमुख हे बंधू हजर होते. जमिनीच्या वादावर पंटूस देशमुख यांनी आवश्यक तो खुलासा केल्यानंतर ही बैठक संपली. पण नंतर साहील आणि सोहेब या दोघांनी पंटूस यांचा मुलगा परवेझ (वय २१) याच्यावर लोखंडी विळ्याने वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर परवेझ यास तातडीने आधी माहुरच्या सरकारी रुग्णालयात आणि तेथून पुसदला नेण्यात आले. पण उपचार करण्यापूर्वीच अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. माहूर या ठिकाणी भावकीच्या वादातून ही घटना घडली आहे. परवेझ पंटुस देशमुख असं मृत भावाचं नाव आहे. त्याच्या चुलत भावांनी त्याच्यावर कोयत्याचे वार करुन त्याची हत्या ( Nanded Crime ) केली.
हे पण वाचा- ऑनलाईन जुगारामुळे कर्ज झाल्याने वृद्धेची हत्या करुन दागिन्यांची चोरी
पोलीस पाटील परसराम भोयर यांच्यासमोरच हत्या
ही घटना पोलीस पाटील परसराम भोयर, रुई गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उत्तमराव सुकळकर, सरपंच प्रतिनिधी गणेश राऊत यांच्या समक्ष घडली. पंटूस देशमुख यांची रुई गावात जेमतेम २० गुंठे शेतजमीन असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. घटनेतील दोन्ही आरोपी त्यांचे सख्खे पुतणे आहेत. त्यांच्या वाट्याची शेतजमीन त्यांच्या वडिलांनी पूर्वीच विकून टाकली, तरी आमची अडीच एकर जमीन तुम्ही आम्हाला द्या अशी मागणी साहील देशमुख करत होता. या प्रकरणात पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षांनी साहील व सोहेब यांना समजही दिली होती. पण बैठक संपताच या दोन भावांनी आपल्या चुलत भावावर अचानक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या ( Nanded Crime ) केली. या घटनेनंतर हे दोघं फरार झाले आहेत.
पोलीस या दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत
या घटनेनंतर पंटूस देशमुख यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.