Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या मृत्यूंप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर. वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसंच, बालरोग विभागातील डॉक्टरवरही हाच गुन्ह्याअंतर्गत कारवाई झाली आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ४१ झाली आहे. रुग्णालयात पुरेसा औषध साठा आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सखोल माहितीकरता समिती स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याआधीच अधिष्ठांतावर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे.
हेही वाचा >> नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप
“नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे… डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहिजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय कारवाई करणार? केवळ डीनवर गुन्हा दाखल करून सरकारला आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येणार नाही!”, असं ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
२२ वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसुतीसाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी तिची प्रसुती होऊन तिला मुलगी झाली. परंतु, शनिवारीच बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळाने महिलेचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयासमोर टाहो फोडला. या महिलेचे नातेवाईक कामाजी टेम्पो यांनी याप्रकरणी बुधवारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अधिष्ठाता श्यामराव वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
डीनला हीन वागणूक, वैद्यकीय संघटनेचा निषेध
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय हे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर शासकीय महाविद्यालयांप्रमाणे अंतिम टप्प्यातील आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये अत्यवस्थ स्वरुपात रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मृत्युचे प्रमाण अधिक असते. दरम्यान, सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना जबाबदार धरून त्यांना हीन वागणूक दिली. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. निष्काळजीमुळे अधिक मृत्यू झाले असल्यास त्याची चौकशी होऊन, कार्यवाही होणे गरजेचे असतानाही अधिष्ठाता पदावर उच्च शिक्षित डॉक्टरांना हीन दर्जाची वागणूक देणे समर्थनीय नाही.