नांदेड : माजी आमदार (दिवंगत) श्रीनिवास गोरठेकर यांचे पुत्र कैलास गोरठेकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून झालेली निवड रद्दबातल ठरवत निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप मारोतराव कवळे यांना विजयी घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थानिक सहकार न्यायालयाने मंगळवारी दिला. या निकालामुळे उमरी तालुक्यातील गोरठेकर गटाला जबर धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे पावणेचार वर्षांपूर्वी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमरी तालुका सेवा सहकारी व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघात गोरठेकर विरुद्ध कवळे यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीत गोरठेकर यांना २४ तर कवळे यांना २२ मते मिळाली. २ मतांनी गोरठेकर विजयी झाल्याचे तेव्हा जाहीर करण्यात आले होते.

वरील निवडणूक लढवताना गोरठेकर यांनी उमरी तालुक्यातील वसंतनगर येथील मजूर सहकारी संस्थेच्या संचालकपदाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. निवडणूुक अधिका-यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला. तथापि नंतर सहकार न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात कवळे यांनी गोरठेकरांच्या त्या अनुभव प्रमाणपत्राला आव्हान देत ते बोगस असल्याचा दावा आवश्यक त्या कागदपत्रांसह केला होता.

सहकार न्यायालयात हे प्रकरण तीन वर्षांहून अधिक काळ चालले. गोरठेकर आणि कवळे यांच्या वकिलांनी आपापली बाजू न्यायालयासमोर मांडली. नांदेड जिल्हा बँकेलाही प्रतिवादी करण्यात आले होते. बँकेनेही आपली भूमिका न्यायालयासमोर स्पष्ट केली. या प्रकरणात समोर आलेली वस्तुस्थिती आणि वादी कवळे यांनी दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरुन सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती के. एच. ठाकूर यांनी गोरठेकरांची निवड रद्दबातल ठरवतानाच कवळे यांना विजयी उमेदवार म्हणून जाहीर करणारा निकाल मंगळवारी दिल्यानंतर उमरी तालुक्यातील गोरठेकर गटात एकच खळबळ उडाली.

सहकार न्यायालयाच्या वरील निर्णयाची माहिती आमच्याकडे अद्याप अधिकृतपणे आलेली नाही. निकालाची प्रत आल्यानंतर ती बँकेच्या संचालक मंडळासमोर ठेवून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

अजय कदम, सीईओ, जिल्हा बँक