लोकसत्ता वार्ताहर
नांदेड : शाखा विस्तार ठप्प आणि कर्मचारी संख्या घटलेली असतानाही नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेच्या ठेवी आणि एकंदर व्यवहारात भरीव वाढ करतानाच १११ कोटींवर असलेला संचित तोटा ३० कोटींपर्यंत खाली आला आहे. बँकेला आणखी सुस्थितीत आणण्यासाठी संचालक मंडळाने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी रविवारी येथे दिली.
बँकेच्या संचालक मंडळाची मासिक सभा गेल्या शनिवारी घेण्यात आली. या बैठकीत पगारदार कर्मचारी तसेच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांसाठी विविध कर्ज योजना राबविण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. बँकेच्या तालुका स्तरावरील शाखांमध्ये ग्राहकांसाठी सोने तारण कर्ज योजना, शेतकरी सभासदांना ट्रॅक्टर व इतर शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी दीर्घ मुदत कर्ज, पगारदार कर्मचार्यांसाठी संकल्पपूर्ती गृहकर्ज योजनेअंतर्गत कर्ज आदी निर्णय घेण्यात आले असून बँकेच्या सर्व ग्राहकांना ‘क्यूआर’ कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२०२१ साली विद्यमान संचालक मंडळ बँकेत आले तेव्हा संचित तोटा १११ कोटी होता. गेल्या ऑक्टोबर २०२३ मध्ये तो ६२ कोटींपर्यंत खाली आला. त्यात आणखी ३३ कोटी रूपये कमी झाले असून एनपीए प्रमाण बँकेने १६ टक्क्यांवर आणले आहे. अनिष्ट तफावत असलेल्या वेगवेगळ्या संस्थांकडून वसुली करण्यात बँकेला यश आल्याचे खतगावकर यांनी सांगितले.
ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान बँकेच्या ठेवींमध्ये ७५ कोटींची तर भाग भांडवलामध्ये साडेतीन कोटींची भर पडली तसेच बँकेच्या गुंतवणुकीत १४४ कोटींची वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या सहकार विभागाने आखलेल्या योजनांना प्रतिसाद देत बँकेने सोलार ऊर्जा निर्मिती संच तसेच गोदामे बांधकामासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मार्चअखेर बँकेचा संचित तोटा आणखी कमी करण्याचा तसेच ढोबळ एनपीएचे प्रमाण १५ टक्क्यांच्या खाली आणण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सभासदांनी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी केले आहे.