नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परीक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर, पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी कंधार तालुक्यातील विविध परीक्षा केंद्राना भेटी दिल्या. यादरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते. त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, श्री. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी (ता. कंधार) यांचा समावेश आहे.
याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहीहंडे गवळी, श्रीमती एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे.
याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम रा. चिखली यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उस्मान नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविले आहेत.
याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे, याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरु होताना कोणती काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट दिशा निर्देश असतात. केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्यात याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या असतात. यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम ठेवावी. संरक्षण भिंत नसलेल्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवावी. बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तीची उपस्थिती राहू नये. कॉपी पुरविणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी. परीक्षा केंद्राच्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुरु ठेवावे. भरारी पथक व बैठे पथक अधिक सक्रीय असावेत, अशा सूचना दिल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी गैरव्यवस्था आढळून आली. त्यामुळे तातडीने आजच्या आज सर्व संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.
पुढील पेपरच्या आत व्यवस्था करा
विद्यार्थ्यांनी पेपर देताना त्यांना कोणत्या सुविधा असाव्यात, त्यांच्यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था, डेस्क बेंचची उपलब्धता, पाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, अनावश्यक पक्षांना बंद ठेवण्याची दक्षता, परीक्षा केंद्र बाहेर जमाव राहणार नाही याची काळजी घेणे याबाबत कुठेही दुरावस्था दिसू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. पुढच्या पेपरच्या वेळी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी फेरी मारणार असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
भरारी पथकांवरच कारवाई करणार
जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख, भरारी पथक, पोलीस, महसूल व तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढच्या पेपर पुर्वी सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपासून 107 परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला ४१ हजार८९८ पैकी ४० हजार ९५o विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. ९७.५२ टक्के उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर जिल्याह्त परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.