नांदेड – नांदेडचे जिल्हा कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर हरिभाऊ खरात यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी या संदर्भातील कारवाईचा आदेश गृहविभागाकडून काढण्यात आला. खरात यांना त्यांच्या समपदस्थ अधिकाऱ्यास रुजू करून घेताना पदावनत करण्यासह नंतर परस्पर लातूरला प्रतिनियुक्तीवर पाठवून कार्यमुक्त करण्याचा प्रताप भोवला आहे.

या संदर्भातील कारण निलंबन कारवाईच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ज्ञानेश्वर खरात हे जिल्हा कारागृह अधीक्षक, वर्ग – २, उपअधीक्षक मध्यवर्ती कारागृह गट – ब (राजपत्रित) या पदावर संवर्गातून शासन सेवेत होते. त्यांची मोर्शी येथील खुल्या कारागृहाच्या अधीक्षकपदी पदोन्नतीनें पदस्थापना करण्यात आली. परंतु खरात त्याच पदावर नांदेड येथे कार्यरत असल्याचे दिसून आले. ११ फेब्रुवारी रोजी संपत हामू आढे यांची खरात यांच्या जागी बदली करण्यात आली.

मात्र खरात यांनी आढे हे त्यांचे समपदस्थ असताना त्यांना उपअधीक्षक पदावर ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रुजू करून घेतले. शिवाय शासन आदेश नसताना आढे यांची लातूर येथे प्रतिनियुक्तीच्या पत्राच्या संदर्भाने परस्पर कार्यमुक्त केले. वस्तुतः खरात, आढे यांच्या पदावरील अधिकाऱ्यांची पदस्थापना, नियुक्तीचे शासन आदेश हे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्गमित केले जातात. मात्र उपरोक्त प्रकारात खरात यांनी शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृह मुख्यालय निलंबन काळात खरात यांचे मुख्यालय अमरावती येथील मध्यवर्ती कारागृह राहील. तसेच कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग नागपूर यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसे केल्यास ते गैरवर्तन ठरेल, असे निलंबन आदेशात म्हटले आहे.