नांदेड : गेल्या सहा वर्षांत नांदेड पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३५ जणांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पोलीस दलातील लाचखोरीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे अभिनव उपाय योजले आहेत.

नांदेड पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांची साडेतीन हजारांहून अधिक असून जे अधिकारी व कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडून रक्कम गोळा करतात, किंवा लाचलूचपत विभागाच्या कारवाईत सापडू शकतात, अशा अधिकारी व अंमलदारांची यादी पुढील पाच दिवसांत सादर करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या तसेच विविध शाखांच्या प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षकांचे हे परिपत्रक सर्व पोलीस ठाण्यांच्या दर्शनी भागात डकविण्यात आले आहे. यापुढे दररोज सकाळ-संध्याकाळच्या हजेरीदरम्यान हे परिपत्रक वाचून दाखविण्याचे आदेशही ठाणेदारांना देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी कोणालाही लाचेची मागणी करू नये तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अशी ताकीद या परिपत्रकात देण्यात आली आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध कारवाई झाल्यास संबंधित प्रभारी अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड पोलीस अधीक्षकांच्या या परिपत्रकाची एक प्रत परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रात लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचाही अंतर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर अन्य तीन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचे उपाय योजले जाणार का, याकडे आता संबंधितांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader