मतदारांना पैसेवाटपाने गाजलेल्या नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या निवडणुकीत काही किरकोळ गैरप्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाले असून निकाल उद्या, सोमवारी जाहीर होईल.
मतदानकाळात काही प्रभागांत काही केंद्रांवर किरकोळ गैरप्रकार झाले. सिडकोत मारहाणीची एक घटना झाली, तर इतवारा भागात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. देगलूर नाका भागात हाणामारी झाली, असे काही प्रकार वगळता मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. मनपाच्या ८१ जागांपैकी १ जागा बिनविरोध निघाली, त्यात काँग्रेसने खाते उघडले. उर्वरित ८० जागांसाठी ५१० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सर्वश्री सुधाकर पांढरे, बलवंतसिंग गाडीवाले, दिलीप कुंदकुर्ते, सरजीतसिंग गिल, विनय गिरडे पाटील (काँग्रेस), चैतन्य देशमुख, अरुंधती पुरंदरे-साले (भाजप), बाळासाहेब देशमुख, सुदर्शना खोमणे, संगीता बियाणी, जयश्री ठाकूर, दीपकसिंह रावत (शिवसेना), गफ्फार खान, शीला कदम, संदीप चिखलीकर, प्रवीण बियाणी, अ‍ॅड. व्यंकटेश पाठनूरकर (राष्ट्रवादी) आदींचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर यांनी शिवाजीनगर प्रभागात मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर काँग्रेसला ३५ ते ४२ जागा मिळतील, असा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला.

Story img Loader