नांदेड : शहरातल्या देगलूर नाका परिसरातील बरकत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका शोरुमला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवार (दि.१५) रोजी दुपारी १ वाजता ही घटना घडली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.देगलूर नाका येथे बरकत कॉम्प्लेक्समध्ये कुल लॅन्ड मार्केटींग हे शोरुम आहे.

सन २०२१ पासून सुरू झालेल्या या शोरुममधून विविध कंपन्यांचे कुलर, वॉशिंग मशिन व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्यांची विक्री होते. एकूण तीन मजल्यांवर हे शोरुम आहे. दुपारी १ वाजेच्या दरम्यान दुसर्‍या मजल्याला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर येथील कर्मचारी व लगतच्या दुकानांतील व्यापार्‍यांनी मोठ्या शर्थीने पहिल्या मजल्यावरील साहित्य बाहेर काढण्यात यश मिळविले. वर्दळीचे ठिकाण असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या योग्यवेळी पोहचल्या, तरी आग नियंत्रणात आणताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

अग्निशामक दलाचे अधिकारी केरुजी दासरे, नीलेश कांबळे यांच्यासह ८ ते १० कर्मचार्‍यांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. पाच बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीनंतर या परिसरात मोठा जमाव जमला होता. दुकानाचे मालक इकबाल अहमद खान व त्यांचे नातेवाईकही तेथे उपस्थित होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

या आगीत तब्बल ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडच्या मालटेकडी परिसरातील एका गोदामाला आग लागली. शिवाय दोन आठवड्यांपूर्वी दाभड येथेही आगीमुळे एक गोठा भक्ष्यस्थानी पडला होता. सोमवारी अग्निशामक सेवा सप्ताहाला प्रारंभ झाला. १४ ते २० एप्रिल या कालावधीत हा सप्ताह साजरा होणार आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले होते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी दिल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अग्निशामक दलाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी देगलूर नाका परिसरातील आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.