नांदेड: शहरातल्या गुरूद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात एटीएसने पंजाब पोलिसांच्या मदतीने आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपीची संख्या आता १० झाली आहे.
नांदेड शहरातल्या गुरूद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी सकाळी गोळीबार झाला होता. या घटनेत रविंद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला. तर गुरमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता. गब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या हरविंदरसिंघ उर्फ रिंधा याच्या सांगण्यावरून झालेल्या घटनेनंतर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता.
एटीएसचे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथील अधिका-यांनी संयुक्तरित्या तपास करून पाच आरोपींना नांदेडात अटक केली होती. त्यानंतर तिघांना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपीविरुद्ध मकोकाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एटीएसने एक मोटरसायकल, एक इनोव्हा, तीन पिस्टल व काडतूसे जप्त केली आहेत. या प्रकरणातील काही आरोपी सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत. काल पंजाब राज्यातील तरणतारण येथून जगजित उर्फ जग्गी संधू याला ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांच्या मदतीने त्याला अटक झाल्यानंतर उद्या (दि.१७) विमानाने नांदेडात आणले जाणार आहे. या प्रकरणातील आरोपीची संख्या आता १० झाली आहे.
जगज्जीत उर्फ जग्गु याच्याकडून एक ३२ बोअर पिस्टल, ८ जीवंत काडतूसे व अन्य ऐवज जप्त करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर जगजित याने सर्व आरोपींशी समन्वय ठेवून काहींची राहण्याची व्यवस्था केली होती. शिवाय काही आरोपींना त्याने रसद पुरवल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खंडणीच्या काही गुन्हांची नोंद आहे.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता एटीएसच्या सुत्रांनी व्यक्त केली. अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याची एटीएसने उत्तमप्रकारे उकल केली आहे. आता या घटनेत किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरु आहे.