लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : शहरातल्या गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध मकोका अन्वये कारवाई करण्यात आली असून सोमवारी तीन प्रमुख आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी (एटीएस) पथकाकडे आहे.

नांदेड शहरातल्या गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारात रविंद्रसिंग दयालसिंग राठोड (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता. गुरमितसिंग सेवालाल (वय ३२) हा गंभीर जखमी झाला होता. गब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधीत हरविंदरसिंग उर्फ रिंदा याच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाला होता. रिंधा याच्या भावाची २०१५ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात गुरमितसिंग सेवालाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पॅरोल रजेवर सुटल्यानंतर त्याचा बदला म्हणून १० फेब्रुवारी त्याच्यावर गोळीबार झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाचा तपास एटीसकडे देण्यात आला. एटीएसने नांदेडच्या मनप्रितसिंग धिल्लो, हरप्रितसिंग कारपेंटर, दलजितसिंग संधू, हरजितसिंग गील, अर्षददिपसिंग या पाच जणांना ताब्यात घेतले होते. मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. २४ फेब्रुवारी रोजी एटीएसने पंजाब पोलिसांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या जगदीश उर्फ जग्गा व शुभदीपसिंग उर्फ शुभ व पलविरसिंग बाजवा या तिघांना अटक केली. विमानाने आरोपी नांदेडला आणल्यानंतर त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

गेल्या १० दिवसात एटीएसने या प्रकरणाचा तपास करताना गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल, एक इनोव्हा, तीन पिस्टल व गोदावरीच्या पात्रातून एक मोबाईल जप्त केला. ही संपूर्ण घटना संघटीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एटीएसने सर्व आरोपींनी मोकोका लावला आहे. सोमवारी या प्रकरणात जगदीश उर्फ जग्गा, शुभदीपसिंग व पलविरसिंग बाजवा या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता एटीएस चे पोलीस उपअधीक्षक माणिक बेदरे यांनी व्यक्त केली.

सध्या अमेरिकेत स्थायिक असलेला हॅपी उर्फ पॅशिया व हरविंदरसिंग रिंधा या दोघांनाही आरोपी करण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींची बॅंक खाती तपासणी करणे, व आरोपींना मदत करणाऱ्या काहींची चौकशी तसेच इतरांचा सहभाग याबाबत तपास करावयाचे असल्याचे सांगत, एटीएसने पोलीस कोठडीची मागणी केली. एटीएसने विनंती मान्य करत न्यायालयाने या तिघांना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.