नांदेड : काँग्रेस पक्षातच राहा, हा भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावून लावत त्यांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानिमित्ताने गेल्या २० वर्षांतील सर्वांत मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्याची नोंद रविवारी जिल्ह्यातील नरसी या गावी झाली.
वरील सोहळ्यास राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, आ.संजय बनसोडे, आ.राजू नवघरे, आ.विक्रम काळे यांच्यासह नांदेड व अन्य जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा जिल्हाभर सुरू होती. एकनाथ शिंदे यांची शिवसेना का, राष्ट्रवादी काँग्रेस या पर्यायांवर खतगावकरांचा विचार सुरू असताना त्यांनी आपले राजकीय विरोधक आ.चिखलीकर यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’मध्ये जाऊ नये आणि काँग्रेस पक्षातच राहावे, अशी इच्छा खा.अशोक चव्हाण यांनी मध्यंतरी खतगावकरांकडे व्यक्त केली होती. पण त्यांचा हा सल्ला धुडकावत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षात प्रवेश घेतानाच सुमारे ३४ वर्षांपूर्वी आपण शंकरराव चव्हाणांमुळे नव्हे, तर शरद पवार यांच्यामुळे राज्यमंत्री झालो होतो हे गुपित खतगावकर यांनी उघड केले, तर ओमप्रकाश पोकर्णा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात समाजवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदापासून झाली होती, याकडे अजित पवारांचे लक्ष वेधले.
मागील महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा पक्षप्रवेश सोहळा नांदेड शहरामध्ये झाल्यानंतर चार तालुका मुख्यालयांना मध्यवर्ती असलेल्या नरसी (ता.नायगाव) येथे खतगावकर आणि त्यांच्या हजारो समर्थकांच्या पक्षांतरामुळे जिल्ह्यातील एका विशाल पक्षप्रवेश सोहळ्याची नोंद झाली. या आधी जानेवारी २००२मध्ये जिल्ह्यातील एक मोठा गट त्यावेळच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाला होता. त्याहून मोठा पक्षप्रवेश सोहळा रविवारी नरसीमध्ये झाला.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या राष्ट्रवादीमध्ये अविनाश घाटे आणि मोहन हंबर्डे या दोन माजी आमदारांनी अलीकडेच प्रवेश घेतला. त्यानंतर खतगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा हे दोन माजी आमदारही या पक्षामध्ये सहभागी झाले आहेत. पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर खतगावकर यांनी मागील आठ दिवसांत आपल्या प्रभावक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना आपल्या नव्या राजकीय पर्वात सहभागी करून घेतले.
खतगावकर आणि पोकर्णा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्यांमध्ये माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, डॉ.मीनल पाटील खतगावकर, गणेशराव पाटील करखेलीकर, अशोक पाटील मुगावकर, बाळासाहेब कवळे पाटील, रवी पाटील खतगावकर, दीपक पावडे, भास्कर पाटील भिलवंडे यांच्यासह मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी आदी तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
प्रवेश सोहळा नव्हे, नवा संकल्प
आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ पक्षप्रवेश सोहळा नाही, तर एक नवा संकल्प आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात नवा इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी हा सोहळा असून खतगावकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. डॉ.मीनल खतगावकर ही मला मुलीसारखी आहे. आज पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचाच सन्मान राखला जाईल.
अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस