नांदेड – पिंपळढवजवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. मृतातील दोघे मातुळ येथील कै. व्यंकटराव देशमुख आश्रम शाळेतील कर्मचारी होते.
हेही वाचा – सातारा : कराडला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पुलावरून जलवाहिनी
भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ सीके ६६५९) व दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ सी एफ ९६१८) या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंगाधर विश्वनाथ म्हैसुरे ( वय ५५ रा.शिळवणी ता .देगलूर. ह.मु.भोकर) तर परसराम किशन डाकोरे ( वय ५० रा.पांडुर्णा ता भोकर) व दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड ( वय २५ रा.नांदा बु ता भोकर) विनायक बुरोड ( वय २५ रा.नांदा बु ) या चौघांचा मृत्यू झाला तर श्रावण हनुमंत पेडेमोडे ( वय २३ रा.कुंभारगाव ता.बिलोली) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले. गंगाधर म्हैसुरे व परसराम डाकोरे हे दोघे कै. व्यंकटराव देशमुख निवासी आश्रम शाळा मातुळ येथे मदतनीस व कामाठी पदावर कार्यरत होते. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालयात मृत्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.