नांदेड – भारतीय रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून किनवट व परिसरातील तरुणांना १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घालणा-या दोघांविरुद्ध किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेवून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
किनवट व परिसरातील काही तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी लावण्याचे आमीष दाखवून हरेंद्र भारती, आशीष पांडे (दोघेही राहणार नवी दिल्ली) व रेल्वे विभागातील काही अधिकारी यांनी अनेक तरुणांना फसविले. भारतीय रेल्वेतील लिपीक पदासाठी जागा उपलब्ध असल्याचे सांगून त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे सांगून आरोपींनी वेगवेगळ्या तरुणांकडून एकूण १ कोटी ११ लाख ८६ हजार रुपये जमा केले. पैसे घेतांना संबंधितांनी नेमणुकीची बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे ई-मेलद्वारे पाठविले. उत्तरप्रदेशातील हापूर येथे प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. २० दिवस तेथे थांबूनही ना प्रशिक्षण झाले, ना कुठली नियुक्ती झाली. काही दिवसांनंतर संबंधितांनी आपले दूरध्वनी बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजाजन बाबू जाधव (वय २५, रा. सुभाषनगर, किनवट) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरेंद्र भारती, आशीष पांडे व अन्य संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे अधिक तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेवून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे. दोन आरोपींची नावे समोर आली असली तरी यात आणखी कोणाकोणाची सहभाग आहे, याचा शोध सुरु आहे.
ग्रामीण भागातील अनेक तरुण वेगवेगळ्या नोकरीच्या शोधात असतात. काहीजण याचाच फायदा घेऊन स्वतःचे आर्थिक हित सांभाळण्यासाठी त्यांची फसवणूक करतात. किनवट सारख्या आदिवासीबहूल भागात फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. प्रशासनाने याबाबतीत वेळोवेळी आवाहन करुनही तरुण मात्र दलालांच्या प्रलोभणाला बळी पडत आहेत.