चार देश, सात राज्यांशी संपर्क ठेवल्यानंतर आरोपींचा शोध लागल्याची पोलिसांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल चार देशांशी पत्रव्यवहार केला होता, तर सात राज्यांत आरोपींचा शोध घेतला जात होता, अशी माहिती विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये वेगवेगळय़ा मार्गानी पोलिसांचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी या सर्वावर मात करत अखेर सहा जणांना अटक केली. 

नांदेड व परिसरातून मंगळवारी इंदरपालसिंघ ऊर्फ सनी तिरतसिंघ मेजर, मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे, सतनामसिंघ ऊर्फ सना दलबिरसिंघ शेरगिल, हरदीपसिंघ ऊर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ वाजवा, गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी सेवकसिंघ गिल आणि करणजितसिंघ रघबिरसिंघ साहू या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वावर संजय बियाणी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बुधवारी सकाळी या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले.

या प्रकरणाचा तपास लवकर लागावा, यासाठी पोलिसांवर मोठय़ा प्रमाणावर राजकीय दबाव टाकण्यात आला होता. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर जाहीर सभेतून पोलिसांवर आरोपींशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. तर, नांदेड पोलीस भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने ते या प्रकरणाचा तपास लावू शकत नाहीत, त्यामुळे हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही निवेदनाद्वारे खासदारांनी ही मागणी लावून धरली होती; परंतु पालकमंत्री अशोक चव्हाण आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा आम्ही छडा लावू या भूमिकेवर ठाम होते. पोलिसांवर प्रचंड दबाव असतानाही आणि वेगवेगळय़ा माध्यमातून तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलिसांनी अत्यंत शांत, संयमी आणि योग्य दिशेने तपास करून मोठे यश मिळविले.

प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या शारदानगर येथील घरासमोरच ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर नांदेडसह संपूर्ण राज्य ढवळून निघाले. या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, खरे आरोपी अटक व्हावेत, यासाठी पोलिसांवर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढत होता. या प्रकरणात बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला कुख्यात हरिवदरसिंघ संधू ऊर्फ रिंदा याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. आरोपींच्या शोधासाठी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकामध्ये ३० अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वेगवेगळी पथके तयार करून वेगवेगळय़ा राज्यात ही पथके पाठविण्यात आली होती. हत्येच्या दिवसांनंतर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले.