नांदेड : दहावीत शिकणा-या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने विष प्राशन केले. शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील कारामुंगे (वय ५५), असे आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
नांदेड तालुक्यातील पुष्पांजली हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक सुनील कारामुंगे (वय ५५) यांनी नांदेड शहरातील दत्तनगर परिसरातील एका दहावीच्या मुलीला २६ मार्च २०२५ रोजी दूरचित्रसंवादाचा फोन केला. या संभाषणाची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. गुरुवारी रात्री त्या मुलीच्या काही नातेवाईकांनी सुनील कारामुंगे यांना मारहाण केली. शिवाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, जिवे मारण्याची धमकी, बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला. मारहाण तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ नांदेडच्या ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. १२ तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी १० वाजता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड या करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची आम्ही सर्व बाजूंनी चौकशी करीत आहोत. काही तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहेत. दूरचित्रसंवादामध्ये (व्हिडिआे काॅल) झालेले संभाषण हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्यांनी मारहाण केली त्याचीही चौकशी होईल. चौकशी दरम्यान जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल.
अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड