Fruits Vendor Cuts Both Hands Of Man: बघून हसल्यामुळे घडलेलं महाभारत जगाला माहित आहे. अशाच कारणावरून महाराष्ट्रातील नांदेडच्या भाग्यनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे आता समोर येत आहे. एका व्यक्तीने भाजी विक्रेत्याचे दोन्ही हात कापल्याची धक्कादायक माहिती समजतेय. मोहम्मद तोहीद असे आरोपीचे नाव असून तो घटनेपासून फरार होता.
प्राप्त माहितीनुसार, १६ ऑगस्टला (बुधवारी) ही घटना घडली आहे. पीडित मोहम्मद अजीम हा भाजी विकण्यासाठी बाजारात गेला होता तिथे त्याच्या शेजारी मोहम्मद तोहिद हा देखील एका गाडीवर फळे विकत होता. एका क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाले जे काही क्षणातच आक्रमक हाणामारीवर पोहोचले. यावेळी माथेफिरू तोहीदने बाजारातून विळा विकत आणून आजीमवर दुपारी चारच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात त्याने अजीमचे दोन्ही हात छाटले, तसेच पाय आणि पाठीला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे.
काही वेळातच घटनास्थळी गर्दी जमली आणि जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. डॉक्टरांना बोलावून पीडितेवर सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा<< भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात, २६ सैनिकांचा मृत्यू? ‘या’ एका चुकीच्या फोटोमुळे सुरु झालाय गोंधळ
दरम्यान, क्षुल्लक कारणावरून अशाप्रकारच्या भीषण हल्ल्यांच्या घटना महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहेत. या घटनेच्या काहीच तासांपूर्वी एका माथेफिरू प्रियकराने १२ वर्षीय मुलीची तिच्याच आईसमोर हत्या केल्याची घटना सुद्धा घडली होती. या मुलीने तरुणाचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने त्याने तिच्या राहत्या घराच्या बिल्डिंगमध्ये जाऊन जिन्यात पीडितेच्या आईसमोर मुलीला आठ वेळा धारदार चाकूने भोकसून हत्या केली होती.