Nandkumar Ghodele : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला समोरं जावं लागलं. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे, दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश का आलं? याची कारणं शोधण्याचं काम नेत्यांकडून केलं जात आहे. यातच आता पुढील काही महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासून जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं. दरम्यान, असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा : “…तर चौकाचौकात मराठी माणसाला मारलं जाईल”, मुंब्र्यातील ‘त्या’ प्रकारावरून मनसेची आगपाखड; दिला इशारा!
नंदकुमार घोडेले काय म्हणाले?
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं की, “जवळपास ३० वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झालं आहे, त्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यानंतर त्याचा फटका बसला असं मला वाटतं. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणाशीही माझी नाराजी नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर आणखी काम करण्याची संधी मिळेल”, असं नंदकुमार घोडेले यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
माजी महापौर नंदकुमार हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यासंदर्भात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, “माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर शहरांचं महापौर केलं होतं. मात्र, आता ते स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत. शिवसेना शिंदे गटात जाऊन त्यांना काय मिळणार? जो मान सन्मान इकडे होता, तो मान सन्मान त्यांना तिकडे मिळणार नाही”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
अंबादास दानवे काय म्हणाले?
माजी महापौर नंदकुमार हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यासंदर्भात बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “संघटना ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु असते. जसे संघटनेतून बाहेर गेले तसे अनेकजण आलेले देखील आहेत. काही लोकांना कमी वेळेत जास्त गोष्टी हव्या असतात. मात्र, आतापर्यंत जे पदे मिळाले आहेत त्याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.