विविध प्रयोगांद्वारे रुग्णसंख्येवर नियंत्रण; तीन प्राणवायू प्रकल्पांची निर्मिती

नंदुरबार : कुपोषणामुळे राज्यात प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलेल्या सातपुडा पर्वत रांगांतील नंदुरबार जिल्ह्याने करोनाच्या संकटात मात्र वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये विलक्षण बदल घडविले. इतर जिल्हे वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि प्राणवायू तुटवड्यामुळे अडचणीत असताना नंदुरबारने एप्रिलच्या प्रारंभी दिवसाला १२०० पर्यंत गेलेली नव्या रुग्णांची संख्या विविध प्रयोगांमुळे आता प्रतिदिन २५० आणि ३०० पर्यंत खाली आणली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनबद्ध कामामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कात टाकली. करोनाचा शिरकाव झाला तेव्हा येथील शासकीय रुग्णालयात केवळ २० खाटांची व्यवस्था होती. प्रशासनाने आता खासगी आणि शासकीय अशा दोन्ही मिळून जिल्ह्यात तब्बल १२०० प्राणवायू, ‘व्हेंटिलेटर’ आणि सर्वसाधारण खाटांची व्यवस्था केली आहे. मनुष्यबळ अपुरे असताना स्थानिक एमबीबीएस, बीएचएमएस आणि परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणेने या परिस्थितीतून मार्ग काढला.

प्राणवायूची राज्यासह संपूर्ण देशात टंचाई भासत आहे, त्याच्या पूर्ततेबाबत जिल्हा ५० टक्के स्वयंपूर्ण झाला आहे. आधी नंदुरबारला प्राणवायूसाठी धुळ्यावर विसंबून राहावे लागत होते. त्यामुळे डॉ. भारुड यांनी जिल्हा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन निधीतून जिल्ह्यात सप्टेंबर २०२० मध्ये हवेतून प्राणवायूनिर्मितीचा पहिला प्रकल्प कार्यान्वित केला. १२५ मोठे सिलिंडर अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. जिल्हाधिकारी भारुड हे स्वत: डॉक्टर असल्याने दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधून फेब्रुवारी २०२१ मध्येच त्यांनी दुसऱ्या प्राणवायूनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली. मार्च महिन्यात तो कार्यान्वितदेखील झाला. जोडीला एप्रिलमध्ये शहादा येथे अशाच पद्धतीने तिसरा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यात हवेतून प्राणवायूनिर्मितीचे तीन शासकीय प्रकल्प झाले. येथील शासकीय रुग्णालयांना आज जवळपास हजार मोठ्या सिलिंडरची गरज भासते. अशा वेळी सुमारे ४०० सिलिंडरची निकड या तीन प्रकल्पातून भागवली जात आहे. तळोदा आणि नवापूरमध्येदेखील अशाच पद्धतीचे छोटेखानी तर शासकीय रुग्णालयाच्या आवारात अधिक क्षमतेच्या प्राणवायूनिर्मिती प्रकल्पाची उभारणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.

जिल्हाधिकारी आणि राजकीय नेते यांच्या पुढाकारातून सामाजिक दायित्व निधीतून माझगाव डॉककडून ३० रुग्णवाहिका मिळाल्या. आज १०८ क्रमांकाच्या वगळता जिल्ह्यात ९६ शासकीय रुग्णवाहिका आहेत, तर दोन शववाहिका जिल्ह्यास प्राप्त झाल्या आहेत. मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनकडून मिळालेल्या २५० ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’चा धडगाव, मोलगी आणि तोरणमाळसारख्या दुर्गम भागात वापर केला जात आहे.

हवेतून प्राणवायूनिर्मिती…

दुसरी लाट आणि त्यामुळे प्राणवायूची लागणारी गरज यांचा अंदाज घेऊन या जिल्ह्यामध्ये हवेतून प्राणवायूनिर्मितीचे तीन शासकीय प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे प्राणवायूचा तुटवडा जिल्ह्याला जाणवला नाही. रुग्णसंख्या वैद्यकीय दक्षतेमुळे हजारांहून कमी करण्यात जिल्ह्याला यश आले. अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांवर मात करीत नंदुरबारने आरोग्य स्वयंपूर्णतेचा आदर्श इतरांसमोर उभा केला आहे.

प्राणवायू परिचारिका…

प्राणवायूनिर्मितीबरोबर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राणवायू परिचारिका (ऑक्सिजन सिस्टर) संकल्पना राबविण्यात येत आहे. १० रुग्णांमागे एक प्राणवायू परिचारिकेची नेमणूक करून रुग्णाच्या गरजेनुसार प्राणवायू देण्याचे नियोजन केले. या उपक्रमातून प्राणवायूची मोठ्या प्रमाणात बचत जिल्हा रुग्णालयाने साध्य करून दाखविली आहे. ही संकल्पना राज्यभर लागू करण्याचा मानस आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

करोनाच्या काळात होत असलेले परिवर्तन हे माझ्या एकट्याचे श्रेय नाही. यामागे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी दिवसरात्र मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने भविष्याचा वेध घेत नंदुरबार जिल्ह्याने टाकलेले हे पाऊल राज्य आणि केंद्र शासनाच्या पाठबळाने शक्य झाले.  – डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

 

Story img Loader