देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स आपल्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांसाठी दिवस रात्र झटत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील नंदूरबारमधून एक धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. गुजरात सीमेला लागून असलेल्या नवापूर भागात काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडे करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सेफ्टी सूट किंवा मास्कदेखील नाही. यापासून वाचण्यासाठी उपचार करताना डॉक्टरांना रेनकोट घालून रूग्णांचा उपचार करावा लागत आहे. तर काही रूग्णालयांमध्ये आणि क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांना पदडे आणि चादर फाडून त्याचे मास्क तयार करावे लागत आहेत.

नंदूरबारमधून अद्याप एकही करोनाचा रूग्ण समोर आला नाही. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. आपल्याला अद्याप करोना सेफ्टी सूट मिळत नसल्याचं या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. दैनिक भास्करनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, रूग्णांचे उपचार करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण अशाप्रकारे आपल्या सुरक्षेची काळजी घेतल असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मास्क मिळत नसल्यानं आम्हाला रूग्णालयातील चादर फाडून मास्क तयार करावे लागत असल्याची माहिती नवापूरमधील सरकारी रूग्णालयातील एका अधिकाऱ्यानं दिली.

गुजरातमधून येणाऱ्यांची तपासणी नाही
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे. या सीमेवर गुजरातमधील आरोग्य विभागाची टीम येणाऱ्या जाणाऱ्यांची थर्मल मशीननं तपासणी करत आहे. परंतु नंदूरबार जिल्हा आरोग्य विभागाकडे थर्मल मशीन नसल्यानं ते केवळ रजिस्टरमध्ये त्यांचं नाव नोंदवून घेत आहेत.

समस्या सोडवणार
डॉक्टरांनी करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी संरक्षण किट देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, लवकरच आरोग्य विभागाला थर्मल मशीन, ग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

Story img Loader