नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आठवडाभरात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असल्याचं सध्या दिसून येत आहे. सोशल मीडियावर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यातून समाजातील धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासना समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र, सध्या अनेक युवक सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याचा दुरुपयोग होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार येथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. मात्र, तरीदेखील अनेक लोक एखादी पोस्ट व्हायरल किंवा स्टेटस ठेवण्याआधी शहानिशा करत नसल्याने पोलीस विभागाचा ताण वाढला आहे. मात्र, आता असं कृत्य करताना जो कुणी आढळेल, त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला.
पी. आर. पाटील म्हणाले, “सोशल मीडियावर काही ठिकाणी धार्मिक विषयांवर समर्थनार्थ किंवा निषेधार्थ स्टेटस ठेवणे किंवा पोस्ट करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नंदुरबारमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमधील ९ आरोपींना तातडीने अटकही करण्यात आली आहे. असं असतानाही काही लोक धार्मिक तेढ वाढवणारे स्टेटस ठेवत आहेत किंवा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करत आहेत. अशा आक्षेपार्ह अजिबात पोस्ट करू नये.”
“अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करताना किंवा स्टेटस ठेवताना कुणी आढळलं तर अशा आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसात अशा पोस्ट करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन आहोत. आमचा सायबर सेल यावर काम करत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना नागरिकांनी अतीशय संयमाने व्यक्त व्हावं,” अशी विनंती वजा आवाहन पी. आर. पाटील यांनी केलं.