नंदुरबार : धडगाव येथील आदिवासी महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू असला तरी न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षाच आहे. धडगाव तालुक्यातील खडक्या येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी केली होती. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवल्याने वडिलांनी तिचा मृतदेह मिठाच्या खड्डयात ठेवला होता. अखेर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून गेल्या आठवडय़ात मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी जवळपास २० दिवसांचा कालावधी लागला होता. आता न्यायवैद्यक अहवाल लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा अहवाल लवकर मिळविण्यासाठी जे. जे. रुग्णालयाशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी विशेष तपासणी पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना दिल्या आहेत.
गेल्या आठवडय़ात शवविच्छेदनाच्या दिवशीच अहवाल जे. जे. रुग्णालयाकडून धडगाव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला होता. न्यायवैद्यक अहवाल मात्र थेट पोलिसांना दिला जातो. तो त्यांना प्राप्त झाला की नाही, हे माहिती नाही. -पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय