जिल्ह्य़ातील शंभर टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे फलोत्पादन व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आयोजित लाभार्थ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंग रावल, पंचायत समिती सभापती सुरेश नाईक, उपसभापती सुरेश पाटील आदी  उपस्थित होते. ज्यावर्षी फलोत्पादन मंत्रिपदाचा कार्यभार आपणाकडे आला, त्यावर्षी जिल्ह्य़ात केवळ ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळत होता. आज हाच निधी तीन ते चार कोटी रुपयापर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. जिल्ह्य़ात सिंचन क्षेत्र वाढीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, बंधारे निर्मितीच्या कामालाही गती देण्यात आली आहे. अमरावती प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाणी शेतीसाठी वळविण्यावर भर देऊन साखळी पद्धतीचे बंधारे बांधण्याचीही योजना लवकरच हाती घेण्यात येणार आहे. बिलाडी पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावून धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. प्रकाशा बुराई उपसा योजनाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी उपसंचालक दिपेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले.

Story img Loader