धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा गुरूवारी रोजी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी तसेच शिलक हे दोन्ही धबधबे सुरु झाले नव्हते. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची त्यावेळी निराशा झाली होती. मात्र यावर्षी बोरी धरण पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस चांगला झाल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण बुधवार, २५ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा सुरु झाला होता. या सांडव्याचे पाणी पुढे बोरी नदीत जाते. या नदीवरील किल्ल्यातील शिलक आणि नर-मादी हे दोन्ही धबधबे सुरु होतात. यामुळेच गुरूवारी दुपारी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेले शिलक आणि नर-मादी हे दोन्ही धबधबे सुरु झाले आहेत.

आणखी वाचा-Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse: मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणं आली समोर; चौकशी समितीच्या अहवाल सादर

किल्ल्याच्या उत्तर बाजूने बोरी नदी किल्ल्यात वाहत येते. नदीला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविण्यात आले आहे. बोरी नदीच्या शेवटच्या टोकाला पूर्व-पश्चिम असा बंधारा अतिशय कल्पकतेने व भक्कमपणे बांधला आहे. बंधार्‍याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यांनाच नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत. धबधब्यातील पाणी १०० फुट खाली फेसाळत जाऊन आदळते. हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण पाहण्यासाठी पर्यटक हा धबधबा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहतात. आता येत्या दोन दिवसांत किल्ल्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nar madi waterfall in the historical naladurg bhuikot fort is start mrj