नाशिकप्रमाणे दिंडोरी मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू आहे. या जागेवर भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत आहे. भगरे यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता. शरद पवार गटाची बैठक सुरू असताना नरहरी झिरवळ तिथे दाखल झाले. बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्ये यांनी झिरवळ हे मंदिराच्या कामासाठी आले होते, योगायोगाने ते बैठकीत सहभागी झाल्याचे नमूद केले. झिरवळ या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती छायाचित्रांमधून सर्वत्र पसरल्यानंतर महायुतीच्या गोटात खळबळ उडाली. खुद्द झिरवळ हे देखील संपर्क क्षेत्राबाहेर गेले होते. दिवसभर त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. परंतु, आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जी काही क्लिप व्हायरल होतेय, भगर सर आणि मी एकाच मंचावर उपस्थित होतो आणि मी तुतारीचा प्रचार करतो ही बातमी पसरवली गेली. त्याची खरी कहाणी अशी आहे की, कुदळ मारायचा कार्यक्रम कोणाच्याही हाताने करा, मी तिथे उपस्थित राहीन, असं मी म्हणालो होतो. तिथे गेल्यावर बसायला खुर्च्या होत्या. आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर बसले होते, त्यांच्या बाजूला मी बसलो. आणि दुसरीकडे बघून मी बोलत होतो. तेवढ्यात बागूल सर उठले आणि तिथे भगरे येऊन बसले. त्यात कोणीतरी फोटो काढला आणि त्या मिनिटांत ते निघून गेले. असा संभ्रम निर्माण करून तेवढा मतदार आता खुळा नाही राहिला”, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलं.
हेही वाचा >> नरहरी झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर?
गोकुळ झिरवळांची तिकिट नाकारली
भगरे आणि झिरवळ हे दोघे दिंडोरी या एकाच भागातील आहेत. संबंधामुळे कदाचित ते गेले असतील, परंतु, त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. आपल्याकडे अनेक उमेदवार भेटायला येतात, असा दाखला छगन भुजबळ यांनी दिला होता. झिरवळ हे मुलगा गोकुळ याच्यासाठी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक होते. त्या अनुषंगाने गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु, तिकीट नाकारण्यात आले होते.
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी शरद पवार गटाचा प्रचार करीत असल्याचा आरोप याआधीच केला होता. त्यास या उपस्थितीने एकप्रकारे दुजोरा मिळाल्याने झिरवळ हे पुन्हा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली होती.