महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं (लोकसभा) तिकीट मिळावं यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत प्रयत्नशील आहेत. युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. आता महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षातील ४० आमदार आणि १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटातच आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर तिसऱ्यांदा निवडणूक लढतील असं दिसतंय. तर महायुतीत या जागेसाठी तीन दावेदार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील नेते किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच चालू आहे. ही रस्सीखेच पाहून येथील विद्यमान खासदार विनायक राऊत म्हणाले, “महायुतीतले लोक आता एकमेकांच्या उरावर बसू लागलेत.” किरण सामंत या जागेसाठी मोर्चेबांधणी करत असताना त्यांचे बंधू उदय सामंत हेदेखील आपल्या भावाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
उदय सामंत काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. कोणीही, कुठल्याही जागेवर दावा करू शकतो. प्रत्येकाला तसा अधिकार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी. या लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वालाख मतं मिळतील. बाजूच्या सिंधुदुर्गमधून म्हणजेच दिपक केसरकरांच्या मतदारसंघात आमचं मोठ मताधिक्य आहे. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा केला आहे.
उदय सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपाचा उमेदवार लढला असेल आणि तिथे आता बदल करायचा असेल, तर हे केवळ बोलण्याने होत नाही. आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे, एकनाथ शिंदेंचा या जागेवर दावा आहे. त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
हे ही वाचा >> सातारा : भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शरद पवार गट आक्रमक; दुग्धाभिषेकासह स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण
मंगळसूत्राचं पावित्र्य जपावं लागेल : राणे
उदय सामंतांच्या वक्तव्यावर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. नारायण राणे म्हणाले, उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल, असं होणार नाही. आम्ही ओरिजनल आहोत. आम्ही पहिल्यापासून इथे आहोत. आम्ही भाजपात असलो तरी या जागेवर आमचा दावा कायम आहे. कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढणार ते आमचा पक्ष ठरवेल. उदय सामंत यांनी यावर भाष्य करू नये, असं मला वाटतं. मी कधी यावर भाष्य करतो का? युतीत नांदायचं असेल तर त्याचं पावित्र्य ठेवावं लागेल. एकदा मंगळसूत्र घातलं की, त्याचं पावित्य जपावं लागेल.