Narayan Rane Reaction On Ajit Pawar Iftar Party Remark: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत एका इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली होती. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी रमजानचे बंधुत्वाचा संदेश देणारा महिना म्हणून वर्णन केले आणि मुस्लिम समुदायातील लोकांना आश्वासन दिले की, जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत.
डोळे तपासण्याचा व्यवसाय
दरम्यान अजित पवार यांच्या या विधानानंतर यावर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून, “अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं वाटतं”, म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “आमच्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याऱ्याला सोडणार नाही…” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले, “असे दिसते की अजित पवारांनी डोळे तपासण्याचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.”
काय म्हणाले होते अजित पवार?
इफ्तार पार्टीत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, “जो कोणी आपल्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करेल, दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, तो कोणीही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले जाणार नाही.”
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सना मलिक, नवाब मलिक आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान, अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनीही चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, “अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही.”