राज्यात काँग्रेस आघाडी ४८ पैकी ३१ जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास काँग्रेस नेते, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राज्यात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरीत राष्ट्रवादी प्रचारात उतरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते नारायण राणे सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, माजी आमदार राजन तेली, स्वाभिमान संघटना अध्यक्ष नितेश राणे, डॉ. राजेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आघाडीचा धर्म पाळणार आहेत. एखादा मतदारसंघ किंवा तालुका विरोध करतोय म्हणून हा प्रश्न तेवढय़ापुरता मर्यादित नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी आहे. त्यांची मने दुभंगलेली असली तरी आम्हालाही मने आहेत. रायगड, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महत्त्वाची आहे, असे राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. मालवणमध्ये २५ प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. त्याला ४७ लोक उपस्थित होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा प्रचंड विरोध आहे असे म्हणता येणार नाही. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मीच सोडविले आणि सोडविणार आहे. भविष्यात विरोधक प्रश्न सोडविणार नाहीत, असा टोला राणे यांनी हाणला. जैतापूर प्रकल्पाबाबत साखरी-नाटेमधील मच्छीमारांचा प्रश्न आहे, आणखी विरोध नाही. हाही प्रश्न मीच केंद्र व राज्य सरकारकडून सोडविणार आहे, असे राणे यांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार दहावी नापास आहेत. ते एमएचे बोगस सर्टिफिकेट दाखवीत आहेत, असे विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले.
राज्यात विरोधकांची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था आहे. मोदी-राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त भाजपचे ज्येष्ठ नेते प्रचारात सहभागी नाहीत, असेही नारायण राणे म्हणाले.

Story img Loader