राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचार सभेत नारायण राणे यांचं नाव न घेत अप्रत्यक्षपणे थेट अक्कल काढली. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर घणाघाती प्रत्युत्तर दिलंय. कोकणात मंजूर निधी आर्थिक वर्ष संपायला ३ महिने शिल्लक आहे तरी १ रुपया खर्च नाही. हा यांचा कारभार आणि आले मोठे अकलेचे धडे शिकवणारे असं म्हणत राणेंनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणे म्हणाले, “मी अजित पवार यांना १०० कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघपाटबंधाऱ्याचं टेंडर काढलं नाही, १३ कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही. वर्ष संपायला ३ महिने आहेत तरी १ रुपयाही खर्च नाही. हा यांचा कारभार आहे. त्यांना मी रस्त्यांची काय स्थिती आहे ते बघून जा म्हणून सांगितलं. विमानतळापासून सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.”

“हा यांचा कारभार आणि मोठे अकलेचे धडे शिकवतात. अर्थसंकल्प कसं मांडलं जातं यावरून आमच्या सर्व विचारवंतांची अक्कल कळते,” असा टोला नारायण राणे यांनी अजित पवार यांना लगावला.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.”

हेही वाचा : “खासदार-आमदार होणं सोपं, पण…”, अजित पवार यांचा उमेदवारांना इशारा

“काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा,” असं आवाहन अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या मतदारांना केलं आहे.

“खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड”

अजित पवार म्हणाले, “खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड आहे. कारण पार्टी तिथं कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथं मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जातं. इथं मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane answer criticism of ajit pawar over smartness in ratnagiri amid election pbs