Narayan Rane on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, भाजपा खासदार नारायण राणे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी मुंबईत घाटकोर येथे दहिहंडीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. नारायण राणे म्हणाले, “मी मालवणला जाणार आहे. पुतळा कोसळला त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनाही मी तिथे बोलावलं आहे. मी माहिती घेऊन उद्या दुपारी दीड वाजता प्रसारमाध्यमांशी बोलेन”.
नारायण राणे म्हणाले, “विरोधकांना, प्रामुख्याने काँग्रेसला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. काँग्रेस कोणत्या क्षेत्रात बदनाम झालेली नाही. असं एखादं क्षेत्र सांगा जिथे काँग्रेस बदनाम झाली नाही. काँग्रेस बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आमच्यावर टीका करत आहे. मात्र त्यांच्या काळात देशात किती बेरोजगारी होती हे त्यांना आठवतंय का? काँग्रेसवाले घरी बसून शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. त्यांनी कधी शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आहे का? कधी महाराजांना नमस्कार केला आहे का?”
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
विरोधी पक्षांनी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, “विरोधकांना दुसरं येतं तरी काय? त्यांनी कधी पुतळ्यासाठी चार पैसे दिले आहेत का? एखादं देऊळ बांधण्यासाठी निधी दिला आहे का? एखादं देऊळ बांधलं आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर इतकी मोठमोठी देवळं बांधली, काँग्रेसवाल्यांनी बांधलेलं एखादं देऊळ तुम्हाला माहिती आहे का? उद्धव ठाकरेंनी तरी बांधलंय का? त्यांनी त्यांच्या वडिलांचा पुतळा उभारला, तोही सरकारी खर्चाने उभारला आहे. त्यांनी काय काय केलंय ते मला सांगायला लावू नका. मी एकेकाला उघडं पाडेन. त्यांनी गेंडे पाळले म्हणून यांना कोणी घाबरणार नाही. त्यासाठी एखादा वाघ बाळगावा लागेल”.
हे ही वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानाविरोधात राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गात आंदोलन
शरद पवारांनी किती मंदिरं बांधली? नारायण राणेंचा प्रश्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की राज्यात पुतळ्यांवरून मतांचं राजकारण केलं जात आहे, हे राजकारण बंद केलं पाहिजे. त्यावर नारायण राणे म्हणाले, “राज ठाकरेंचं म्हणणं खरं आहे. विरोधकांना दुसरे काही मुद्दे सापडत नाहीत. विरोधक हे मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. त्यांनी आजवर विधायक. सामाजिक किंवा धार्मिक क्षेत्रात काम केलेलं नाही. शरद पवारांनी आजवर किती मंदिरं बांधली आहेत? एखादं नाव सांगा. शरद पवारांनी किते पुतळे उभारले? राहुल गांधींनी तर यावर बोलूच नये. ते कोणत्या धर्माचे आहेत तेच कळत नाही”.