चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे याबाबत बरीच राजकीय चर्चा सुरू झाली होती. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या श्रेयावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. खुद्द नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाचं श्रेय आमचं आहे, असं ठामपणे सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या भाषणात दावे-प्रतिदावे होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यावेळी नारायण राणेंनी केलेल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्यांनी केलेला विकासाबद्दल सांगितलं. “इथे ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचं नाव तिथे येऊच शकत नाही”, असं राणे यावेळी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राणे…

इथे येऊन राजकारण करू नये असं मला वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारं विमान डोळे भरून पाहावं या हेतूने मी आलो होतो. विमानं पाहून आनंद वाटला. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब भेटले. माझ्या कानात काहीतरी बोलले, पण मी त्यातला एकही शब्द ऐकला नाही.

माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ९० साली मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तू जा, तुला मागणी आहे. मी निवडून आलो. मी हा जिल्हा पाहिला. जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला. उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलं.

९५ साली शिवसेनेची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. देशातला एकमेव जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर इथे सर्व प्रकारच्या विकासासाठी तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. गोपीनाथ मुंडेंना सांगून ब्रीज आणि रस्त्यांसाठी १२० कोटी दिले.

राज्याच्या १०वी-१२वीच्या निकालात पहिले ७-८ तरी सिंधुदुर्गचे असतात. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळी शिवसेना होती. साहेबांचं श्रेय आहे. माझं नाही. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स करायचा, त्याचं क्रेडिट तो बॅटला द्यायचा. मी क्रेडिट घेतच नाही. मला सामान्यांसाठी काम करणं आवडतं. उद्धवजी, एक विनंती आहे. याच जागेवर मी आणि प्रभू १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होतं की भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावं घेतली तर राजकारण होईल.

अजित पवार साहेबांनी अधिग्रहणासाठी १०० कोटी रुपये दिले सीवर्ल्डच्या. पण काय झालं? कुणी रद्द केलं? कोण तिथे आंदोलन करत होतं? आहेत स्टेजवर. भांडं काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजताय तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचंय, तुम्ही आलात, मला बरं वाटलं.

सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी इथला अभ्यास करावा. ४८१ पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात. तुम्ही वाचावा आणि द्या त्यासाठी पैसे. धरणाला एक रुपया दिला नाही. माझ्या वेळी जेवढी धरणाची कामं झाली, त्याच्या पुढे आज काम गेलेलं नाही. काय विकास? इथेही एअरपोर्टला पाणी नाहीये. विजेची लाईन नाही. ३४ कोटींचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झालं, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? हे खड्डे पाहावेत? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीनं करायला पाहिजे.

मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र म्हसकर गेले आणि दुसरे आले कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत हातात माईक घेतात, म्हटलं हा कार्यक्रम कुणाचा आहे? एमआयडीसीचा आहे, म्हसकर साहेबांचा आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा कळलंच नाही. कसला प्रोटोकॉल? मला कळत नाही म्हसकर साहेब आपण राजीनामा दिला की कंपनी विकली. नियमानं करा. मान-सन्मान जनता देईल. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्याला साहेबांजवळ थारा नव्हता. सगळं तुम्हाला कळतंय पण खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय काम करतायत, याची माहिती गुप्तपणे कुणालातरी नेमून घ्या. आदित्य ठाकरे माझ्या जिल्ह्यात आला. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे. मी काहीच बोलत नाही आणि बोलणार नाही. त्याला शुभेच्छा देईन. बाळासाहेबांना आणि सन्माननीय उद्धव ठाकरेंना कर्तबगार मंत्री म्हणून काम करून दाखवा. मला आनंद आहे.

सिंधुदुर्गात वाईट बुद्धीने हेतूने यायचं आणि परत जायचं हे सोपं नाही. चांगल्या मनाने या, निसर्गाचा आनंद सुटा. आमची हवा, निसर्ग. छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पावन झाला. त्या नावाप्रमाणे आपण संकल्प करुया. किल्ल्याची डागडुजी करून दाखवा. चांगलं काहीतरी करून दाखवा. नुसतं महाराजांचं नाव नको, त्यांच्यासाठी केलं पाहिजे. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल. असो. जास्त बोललो. राज्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. पण मी मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. ८० टक्के उद्योग माझ्या अखत्यारीत येतात. राज्यासाठी जास्तीत जास्त उद्योग यावेत यासाठी मी प्रयत्न करणार. पुढच्या ८-१० दिवसांतच सिंधुदुर्गात सगळे अधिकारी येणार. समुद्रकिनारी काय उद्योग होऊ शकतात, त्यासाठी मार्गदर्शन करतील. त्यात एमआयडीसीचं सहकार्य अपेक्षित आहे.

हा जिल्हा सुजलाम सुफलाम करणं हा माझा मानस आहे. प्रयत्न कायमस्वरूपी राहतील. त्या अडचणींची मी दखलही घेत नाही. बिचारे राऊत विमानात पेढे घेऊन आले. मी थोडासा घेतला कारण डायबेटिस आहे. मी त्यांना म्हटलं राऊतजी, या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. आत्मसात करा. माझी एवढीच इच्छा आहे की बोलायचं तर चांगलं बोला. हसत बोला. मग लोकांना वाटतं की या व्यक्तीकडे विचार आहे. विचारातून माणसांची मनं जिंकता येतात, हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही.

ज्योतिरादित्य सिंदियांचे आभार मानतो. मी सांगताच त्यांनी परवानगी दिली आणि कार्यक्रमासाठी तारीख दिली. असते तर आनंद झाला असता. असू द्या, भविष्या या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane at chipi airport inauguration targets shivsena uddhav thackeray pmw