केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांचा आणि शिवसेनेचा संघर्ष सुरू आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं, आमदार नितेश राणे आणि निलेश राणे हे सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. नारायण राणे यांनी आज (५ ऑक्टोबर) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी काही वेळापूर्वी सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाच्या ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमाविषयी विचारल्यावर नारायण राणे संतापले. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, मला आता जेवायचं आहे रे…तू असं नाव घेतलंय की मला जेवण पण जाणार नाही…कसला कार्यक्रम आहे तो? त्यावर राणे यांना सांगण्यात आलं की, ठाकरे गटाने जनतेशी चर्चा करण्यासाठी ‘होऊ दे चर्चा’ असा कार्यक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांतील कामांवर चर्चा केली जात आहे. यावर नारायण राणे म्हणाले, मोदींच्या १० वर्षांतील कामाविषयी बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं ते सांगावं.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय पराक्रम केला ते सांगावं, राज्याचं दरडोई उत्पन्न किती वाढवलं? जीडीपी किती वाढवला? किती रोजगार निर्माण करून दिले. गरिबीचं प्रमाण किती कमी केलं? कुपोषणाचं प्रमाण किती कमी केलं? मुळात हे विषय उद्धव ठाकरेंना कळणार नाहीत. त्यांना यातली माहितीही नसेल. खोके-ठोके याच्यापलिकडे ते जात नाहीत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी (४ ऑक्टोबर) खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलतानादेखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे म्हणाले, “माझं तोंड उद्धव ठाकरेंनी उघडायला लावू नये. अन्यथा ‘मातोश्री’चा दरवाजा उघडणार नाही. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा.”

हे ही वाचा >> “भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”

“सुब्रत सहारा यांनी एक हॉटेल विकत घेतलं. तेथील पहिल्या कामगारांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मग, हॉटेलमधील १४० मराठी कामगारांना कामावरून काढायचं कसं हा प्रश्न पडला. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हॉटेलमध्ये दगडफेक करण्यात सांगितलं. नंतर उद्धव ठाकरेंकडे तडजोड झाली. एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे ७ कोटी रुपये उद्धव ठाकरेंनी घेतले. त्यामुळे १४० कामगार बेकार झाले,” असं नाराय राणे यांनी सांगितलं.