प्रदेशाध्यक्ष आ. भास्करराव जाधव आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रितपणे आघाडीचे उमेदवार खा. डॉ. नीलेश राणे यांचा प्रचार करणार असून त्यांना रत्नागिरी जिल्ह्य़ातील तीनही विधासभा मतदारसंघांतून चांगले मताधिक्य मिळवून देतील, असा निर्धार काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे रमेश कीर व शेखर निकम यांनी व्यक्त करतानाच निवडणूक कालावधीत ‘एक कुटुंब’ म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. राणे व सामंत यांच्यातील गैरसमज दूर झाले असून त्यांच्यात चांगले घरोब्याचे संबंध आहेत, असे सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगतानाच बंद खोलीतील ‘तो’ विषय कायमचा संपला असल्याचा दावा केला.
तर खा. नीलेश राणे यांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेतील गौप्यस्फोटाचा काँग्रेस आघाडीवर तसेच आघाडीचे उमेदवार राणे यांच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार आ. विनायक राऊत यांच्याशी बंद खोलीत चर्चा केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस उमेदवार खा. डॉ. नीलेश राणे यांनी गुरुवारी (६ मार्च) तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून सावंत-राऊत यांच्यातील ‘ती’ भेट संशय निर्माण करणारी ठरली आहे.
याबाबत खुलासा करण्यासाठी आज दुपारी पालकमंत्री सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पालकमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार गणपत कदम व सुभाष बने, राष्ट्रवादीचे महंमद रखांगी, बाबाजी जाधव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्याचे जिल्हाध्यक्ष कीर व निकम यांनी सांगितले.
दरम्यान, खा. राणे यांनी ‘त्या’ पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री या नात्याने सामंत यांना राऊतांशी चर्चाच करावयाची असेल तर त्यांनी ती उघडपणे करणे जरुरीचे होते. पण बंद खोलीत चर्चा झाल्यामुळे ती चर्चा संशय निर्माण करणारी ठरली आहे.  पालकमंत्र्यांकडून त्याबाबत खुलासा व्हावा, अशी अपेक्षा खा. राणे यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी आपले हे वक्तव्य म्हणजे पालकमंत्र्यांना तंबी आहे, सूचना आहे की डोस आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, तुम्हाला काय समजायचे ते समजा, असे उत्तर देतानाच विनायक राऊत यांना आताच पराभवाची चाहूल लागल्यामुळे त्यांनी अशा चर्चा बंद खोलीत सुरू केल्याचा टोमणाही राणे यांनी मारला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा